जीवनसत्वयुक्त पाकक्रिया दैनंदिन जीवनशैलीत अंगीकारून स्मार्ट व्हा ! - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 6 October 2022

जीवनसत्वयुक्त पाकक्रिया दैनंदिन जीवनशैलीत अंगीकारून स्मार्ट व्हा ! - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर

किनवट, दि.06  : सणासुदीला आपण घर चकाचक करतो. तसं तुमची अंगणवाडी, तुमचं गाव स्वच्छ झालं पाहिजे. आई ही एक दोन बालकाची असते. अंगणवाडी सेविका म्हणजे तुम्ही सर्व गावाची माता आहात. अर्भक ते बालक असं आपलं आहार नियोजन असतं. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत जीवनसत्वयुक्त पाकक्रिया दैनंदिन जीवनशैलीत उपयोग करून तसेच तुम्ही सुद्धा याचा अंगीकार करून स्मार्ट व्हा. तुम्ही स्मार्ट तर गाव स्मार्ट , जिल्हा स्मार्ट असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.


         येथील पंचायत समिती सभागृहात एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाचा वतीने आयोजित राष्ट्रीय पोषण माह समारोप प्रसंगी त्या प्रमुख अतिथी म्हणून अंगणवाडी सेविकांशी संवाद साधतांना बोलत होत्या. यावेळी आमदार भीमराव केराम, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण पुजार, तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रशांत दिग्रसकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे , कांचन दिग्रसकर, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, उपविभागीय अभियंता किशोर संद्री, पशुधन विकास अधिकारी डॉ. एस.एन. आडपोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे व बालविकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड मंचावर उपस्थित होते.


      महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम पाटील यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. प्रारंभी मान्यवरांचे हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रामाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून दीप प्रज्वलनाने सेविका आहार प्रात्यक्षिक स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अंगणवाडी सेविका पूनम सोनकांबळे , मनीषा वाघमारे व सुनिता मेंढे यांनी सुरेश पाटील यांच्या संवादिनी व राहूल तामगाडगे याच्या अ‍ॅक्टोपॅड साथीने स्वागत गीत गाईले.


      मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी बिरसा मुंडाची वेशभूषा करून आलेल्या सहा महिन्याच्या लंकेश शैलेश आत्राम या बाळास आपल्या कडेवर घेऊन त्याला अन्नाचा पहिला घास भरविला. माला गजानन फरकुंडे व  किरण रवि रॅपनवार या स्तनदा मातांना मान्यवरांच्या हस्ते बेबी केअर कीट वाटप करण्यात आले. जलधारा तांडा येथील पारंपरिक गोरमाटी (बंजारा ) वेशभूषेत आलेल्या शिल्पा लखन पवार ह्या गरोदर मातेची सीईओ घुगे मॅडम यांनी ओटी भरली. अंबाडी येथील कार्यकर्ती रुपाली वासाटे यांनी स्नेहल पाटील, कल्याणी पाटील, गुंजन मुनेश्वर, ऋती बोनिंगे, यशस्वी पाटील, सलोनी गेडाम, साक्षी नगराळे,  गोकुंदा येथील कार्यकर्ती श्रीमती ए. एस. जाधव यांनी मधुश्री विश्वनाथवार ह्या विद्यार्थ्यांना फॅन्सी ड्रेस व नृत्यात सहभागी केले. कोसमेट येथील अवनी जंगिलवाड, विवेक साखरे, जलधरा येथील आराध्या  शिरडे हे चिमुकले फॅन्सी ड्रेस स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी सुदृढ बालकांना सन्मानपत्र बहाल करण्यात आले. आहार प्रात्यक्षिक स्पर्धेत मांडलेल्या तालुक्यातील अस्सल रानभाज्या व ग्रामीण प्रथिनेयुक्त अनेक प्रकारच्या चविष्ट पदार्थांचे मान्यवरांनी तोंडभरून कौतुक केले. अंगणवाडी पर्यवेक्षिका, कार्यकर्ती, सेविका यांच्यासोबत पोषणयुक्त नृत्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी ठेका धरला होता.


       यावेळी मंचावरील मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवडा निमित्त अनेक योजनांचा लाभ देण्यात आला. कोविड-19 लसीकरण जनजागृती गीते सादर केल्या बद्दल सुरेश पाटील, राहूल तामगाडगे व सूरज पाटील यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गाने सकाळी 8 ते 9 दरम्यान सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्यमिक विद्यालयाच्या लेझिम पथकासह अंगणवाडी सेविकांची पोषण आहार संदेश रॅली काढण्यात आली होती.

No comments:

Post a Comment

Pages