दिवाळीपूर्वीच शेतकर्‍यांना अनुदान वाटपाचा मार्ग मोकळा ; माजी आ.प्रदीप नाईकांच्या पाठपुराव्याला यश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 17 October 2022

दिवाळीपूर्वीच शेतकर्‍यांना अनुदान वाटपाचा मार्ग मोकळा ; माजी आ.प्रदीप नाईकांच्या पाठपुराव्याला यश

किनवट (प्रतिनिधी) : अतिवृष्टीने बाधित शेतकर्‍यांना त्वरित अनुदान वाटप करावे आणि नजरअंदाज मध्ये 50 टक्क्यापेक्षा जास्त दाखविलेली पैसेवारी येत्या सुधारित पैसेवारीत दुरुस्त करावी तसेच दीर्घ काळ रखडलेल्या प्रलंबित राष्ट्रीय महामार्गाच्या समस्येबाबत तोडगा काढावा या मागण्यांसाठी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी तहसीलदार व प्रभारी उपजिल्हाधिकारी डॉ.मृणाल जाधव यांची गुरूवारी (दि.13) प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. चर्चेदरम्यान शेतकर्‍यांच्या  विदारक परिस्थितीतबाबत प्रभावी वक्तव्य केल्यामुळे त्यास प्रतिसाद मिळून अनुदान वाटपाचा मार्ग सध्या मोकळा झालेला आहे.


     जून व सप्टेंबरमधील तालुक्यात नऊवेळा झालेली अतिवृष्टी व सध्या परतीच्या पावसाने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे.  सणासुदीच्या काळात अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी  आलेले 67 कोटी रुपये त्वरित वाटप केल्यास त्यांच्या दु:खात थोडा फार दिलासा मिळेल, तसेच तालुक्यात झालेली अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे  शेकडो हेक्टर जमीनीचे 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाचा असतांनाही नजरअंदाज पैसेवारी 50 टकक्यापेक्षा जास्त येणे हे आश्चर्यकारक असून, येत्या सुधारित पैसेवारीत ही चूक दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी तहसीलदार व प्रभारी उपविभागीय अधिकारी डॉ.मृणाल जाधव यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान होती. सुदैवाने त्यास प्रतिसाद मिळून अनुदानाची रक्कम व बाधित शेतकर्‍यांच्या याद्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत पाठविण्यात आल्याची माहिती महसूल विभागाकडून कळाली. तसेच 18 तारखेपासून अनुदानाची रक्कम  बाधित शेतकर्‍यांमध्ये वाटप करण्यात येईल, असे जिल्हा बँकेच्या सूत्रांकडून कळाले.


      किनवट तालुका ओल्या दुष्काळाच्या छायेत असतांना, नुकसानभरपाईसाठी होणारा विलंब आणि नजरअंदाज पैसेवारी 50 टक्क्यापेक्षा जास्त जाहीर झाल्याने, शासनाची मदतीची आशा मावळल्यासारखी झाली होती. ही बाब लक्षात घेऊन माजी आमदार प्रदीक नाईक यांनी शेतकर्‍यांच्या मदतीसाठी या प्रश्नाचा पाठपुरावा सुरू केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एम.डी.कदम यांच्या भ्रमणभाषद्वारे संपर्क करून शेतकर्‍यांच्या बिकटस्थितीची कल्पना देऊन दिवाळीपूर्वी त्वरित अनुदान वाटपासाठी आग्रह धरला. सोबतच तहसीलदार डॉ.जाधव यांनीही कर्तव्यदक्षपणे पावले उचलून सूत्रे हलविल्यामुळे शेतकर्‍यांच्या अनुदान वाटपाची समस्या सध्या मार्गी लागली आहे. परिणामी मा.आ.नाईकांच्या प्रयत्नांमुळे शेकडो शेतकर्‍यांची दिवाळी गोड होणार आहे. याच बैठकीत प्रभारी उपविभागीय अधिकारी डॉ.जाधव यांना राष्ट्रीय महामार्ग क्र.161 ए चे गत तीन-चार वर्षापासून प्रलंबित असलेल्या भिजत घोंगड्याबाबतही लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन ही समस्याही निकाली काढावी, अशी मागणी केली. कारण, अर्धवट महामार्गामुळे अनेक ठिकाणी अपघात होऊन निष्पाप लोकांचा बळी जात आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेला धारेवर धरत काम लवकर पूर्ण करणे गरजेचे असल्याचे, त्यांनी या वेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Pages