नांदेड दि. 15 :-राज्याच्या काही भागात उशिराच्या मान्सूनमुळे काही शेतकऱ्यांना अद्यापही आपली ई-पीक पाहणी पूर्ण करता आलेली नाही. याचा विचार करुन जमाबंदी आयुक्त पुणे यांच्या मान्यतेने मोबाईल ॲपद्वारे शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीची कालमर्यादा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खरीप हंगाम 2022 च्या शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीची कालमर्यादा 22 ऑक्टोंबर 2022 पर्यंत वाढचिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणीचा कालावधी 23 ऑक्टोंबर ते 15 नोव्हेंबर 2022 असा करण्यात येत आहे. खरीप हंगाम 2022 ची ई-पीक पाहणी करण्यासाठी ही अंतिम मुदतवाढ आहे.
जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक तसेच मंडळ कृषि अधिकारी आणि सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन राज्य समन्वय, ई-पीक पाहणी प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय तथा उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे यांनी केले आहे.
राज्यव्यापी केलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. सध्या खरीप 2022 हंगामाची पीक पाहणीची कार्यवाही सुरू आहे. खरीप हंगाम 2022 च्या ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे 2.0.4 हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. खरीप हंगाम 2022 ची ई-पीक पाहणी प्रत्यक्ष मोबाईल ॲपद्वारे करण्यासाठी 15 ऑक्टोंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
No comments:
Post a Comment