बुद्धाचा मार्ग अनुसरला तरच स्वातंत्र्य,समता व बंधुत्व या तिन्ही गोष्टी एकत्र राहू शकतील -प्रा. डॉ. पंजाब शेरे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 15 November 2022

बुद्धाचा मार्ग अनुसरला तरच स्वातंत्र्य,समता व बंधुत्व या तिन्ही गोष्टी एकत्र राहू शकतील -प्रा. डॉ. पंजाब शेरे

किनवट, दि.15  :  स्वतंत्र समाजाच्या धारणेसाठी धर्म आवश्यक आहे. समाजात समता प्रस्थापित करतांना बुद्धाचा मार्ग अनुसरला तरच स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तिन्ही गोष्टी एकत्र राहू शकतील, असे प्रतिपादन अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे तालुका सरचिटणीस प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी केले.

     सिद्धार्थनगर गोकुंदा येथील गंधकुटी बुद्ध विहारात सम्यक सम्बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून सावित्रीबाई फुले विचार मंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके व कमलाताई पाटील तसेच प्रमुख पाहुणे म्हणून रिपाईंचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष विनोद भरणे , गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, पत्रकार गोकुळ भवरे, अ‍ॅड. मिलिंद सर्पे,  राजेश पाटील, माजी केंद्रप्रमुख विश्वनाथ नरवाडे , पर्यटन व प्रचार विभागाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे, आनंद चंद्रे, सरपंच अनुसया सिडाम, ग्रामपंचायत सदस्य निर्मला कांबळे, रेखा दांडेगावकर, पप्पू कर्णेवार, संजय सिडाम, माजी सरपंच प्रवीण म्याकलवार, माजी उपसरपंच शेख सलीम, सदस्य प्रतिनिधी प्रमोद कोसरे उपस्थित होते.

      यावेळी बोलतांना प्राचार्या शुभांगीताई ठमके म्हणाल्या की,  माणसाचे माणसाशी असलेले माणुसकीचे नाते हाच बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू असून, ते पहिले अधिष्ठानही आहे, असे  तथागतांनी सांगितले होते. सध्या मात्र, माणसावर माणसाचा विश्वास राहिलेला नसून, सुखाचा शोध संपलेला नाही. दुःखमुक्तीचे संशोधनही थांबलेले नाही. बुद्धाने मात्र अडीच हजार वर्षांपूर्वी दुःखावर उपाय सुचविला होता.

       बुद्ध विहार समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी पुष्पपुजा केल्यानंतर पूज्य भदंत सारीपुत्त यांनी बुद्ध वंदना घेऊन तथागतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. प्रज्ञाचक्षू संगीतकार अनिल उमरे, वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे संस्थापक प्राचार्य सुरेश पाटील, दिलीप मुनेश्वर यांनी बुद्ध भीम गीते सादर केली. सत्यभामा महामुने यांनी प्रास्ताविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती कदम यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Pages