किनवट शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे पालिका प्रशासकाचे आवाहन ; स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 मध्ये उच्च मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 14 January 2023

किनवट शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे पालिका प्रशासकाचे आवाहन ; स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 मध्ये उच्च मानांकन मिळविण्यासाठी प्रयत्न

किनवट. दि.14(प्रतिनिधी) : किनवट नगरपरिषदेच्यावतीने किनवट शहर हे स्वच्छ, सुंदर व नीटनेटके ठेवण्यासोबतच  अतिक्रमण मुक्त करून शहराच्या विकासासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या जाणार आहेत. त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांनी आपले शहर अतिक्रमणमुक्त व प्लास्टीक मुक्त करण्यासाठी  सक्रिय  सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ.मृणाल जाधव यांनी केले आहे.


      प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार शहरातील नागरिकांनी आपल्या घरात निर्माण होणारा ओला,सुका व घातक कचरा वेगवेगळ्या स्वरूपात वर्गीकृत करून नगर परिषदेने उपलब्ध करुन दिलेल्या घंटागाडीच्या मदतनिसाकडे द्यावा. तसेच शहरातील डॉक्टरांनी त्यांच्या रुग्णालयात निर्माण होणारा घातक कचरा घंटागाडी मदतनिसाकडे न देता तो घातक कचरा त्यांनी नियुक्त केलेल्या एजंसीकडेच द्यावा.


    शहरातील विविध आस्थापना चालकांसह नागरिकांनी प्लास्टीकचे कॅरिबॅग व एकल प्लास्टीकचा वापर व विक्री करु नये. पाळीव प्राणीपालकांनी त्यांच्याकडील पाळीव प्राणी मोकाट रस्त्यावर सोडू नये. अन्यथा मोकाट जनावरे कोंडवाड्यात टाकून संबंधिताविरुध्द दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. आस्थापणाचालकांनी सुका कचरा संकलित करण्याकरिता निळ्या रंगाचे ‘डस्टबिन’,ओल्या कचर्‍यासाठी  हिरव्या रंगाचे ‘डस्टबिन’ आणि  घातक कचरा संकलीत करण्याकरिता लाल रंगाच्या डस्टबिनचा वापर करावा.  आपल्या आस्थापनेच्या दर्शनीभागात कचरा संकलित करण्याकरिता वेगवेगल्या रंगाच्या ‘डस्टबिन’ ठेवाव्यात. नगर परिषदेला विकासात्मक कामे करण्यासाठी व नागरिकांना अत्यावश्यक सेवा सुविधा पुरविण्याकरिता नागरिकांनी त्यांचेकडे थकीत असलेला व चालू विविध स्वरुपांच्या करांचा भरणा पालिकेकडे करुन सहकार्य करावे.


   स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 मध्ये शहरातील हॉटेल्स, शाळा, महाविद्यालये व दवाखाने यांची तपासणी होणार आहे.  या सर्व्हेक्षणात किनवट शहरास उच्च मानांकन मिळवून देण्याकरिता शहरातील शाळा, महाविद्यालय, दवाखाना व हॉटेल्स या आस्थापणा चालविणार्‍यांनी व नागरिकांनी आपआपला परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवण्याची खबरदारी घ्यावी. शहरातील सर्व शाळा,महाविद्यालये व हॉस्पिटल्स यांच्यामध्ये 13 जानेवारी ते 23 जानेवारी 2023 या कालावधीत साफसफाई व स्वच्छतेबाबत स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. येत्या 24 व 25 जानेवारीला पालिकेकडून या सर्व आस्थापनांची तपासणी करण्यात येणार आहे. यात स्वच्छता नियमांचे उल्लंघन केलेले आढळल्यास दंडात्मक कार्यवाही आणि उत्कृष्ट स्वच्छता राखणार्‍या आस्थापनेस पालिकेकडून पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व आस्थापना चालकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages