अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी एसटी चे ‘सुरक्षितता अभियान’ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 14 January 2023

अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी एसटी चे ‘सुरक्षितता अभियान’

किनवट. दि.14(प्रतिनिधी) : देशात दरवर्षी हजारो लोक रस्ते अपघातात आपला जीव गमावतात.  त्यामुळे रस्ते अपघात आणि मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी त्यावरील उपाययोजनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी दि. 11 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीत देशात ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ साजरा केला जातो. त्याअंतर्गत सर्वसामान्यांना वाहतुकीशी संबंधित नियमांची माहिती दिली जाते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे 11 ते 25 जानेवारी दरम्यान रस्ता सुरक्षितता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा भाग म्हणून नांदेड विभागातील किनवट आगारामध्ये बुधवारी (दि.11)‘ रस्ता सुरक्षितता मोहिमे’चा शुभारंभ करण्यात आला.


    या अनुषंगाने "सडक सुरक्षा-जीवन रक्षा', ‘सुरक्षित प्रवास हेच एसटीचे प्रमुख ध्येय’, ‘अपघात मुक्त सेवा देण्यासाठी एसटीचे चालक कटिबद्ध’ असे ब्रीद घेऊन सध्या दररोज सुमारे 40 लाख प्रवाशांना दळणवळणाची सुरक्षित सेवा देणारी एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे. गेल्या 75 वर्षात अविरत आणि सुरक्षित सेवेच्या माध्यमातून प्रवाशांच्या मनात एसटीबद्दल विश्वासार्हतेची भावना निर्माण झाली आहे. या विश्वासाला बळकटी देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळामध्ये दरवर्षी जानेवारी- फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरक्षितता मोहीम राबविण्यात येते. या मोहिमे दरम्यान चालकांचे प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जातो. या सुरक्षितता अभियानांतर्गत अपघाताची विविध कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने एसटीने चालकांसाठी वेळोवेळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. चालकांना सुरक्षित प्रवासाचे महत्व पटवून देण्याबरोबरच त्यांचे मानसिक संतुलन सुदृढ करण्याच्या दृष्टीने आगार पातळीवर प्रबोधन देखील करण्यात येत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षात इतर प्रवासी वाहनांच्या तुलनेत एसटीच्या अपघातांची संख्या कमी आहे.या सुरक्षितता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, वाहतुकीचे नियमाचे पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मनःस्वास्थ्य या चतु:सूत्रीचे पालन करीत एसटीच्या चालकांनी यंदाच्या वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेला अपघात विरहित सेवा देण्यासाठी कंबर कसली आहे.


     या पार्श्वभूमीवर सदर सुरक्षितता मोहिमेचे उद्घाटन किनवट आगारातर्फे बुधवारी (दि.11)   डॉ. मार्तंड कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगारप्रमुख संजय आकुलवार हे होते. यावेळी व्यासपीठावर वाहतूक निरीक्षक शेख मो.स.गयासोद्दीन, गंगय्या सटलावार,राजकिरण नेम्मानीवार,संजय मरडे यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान चालक कोंडे व गंगय्या सटलावार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करतांना आगार प्रमुख संजय आकुलवार यांनी दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालून व मोबाईलचा वापर न करता वाहन चालवावे, मद्यपान करून तसेच ट्रीपल सीट घेऊन दुचाकी चालवू नये.  चारचाकी वाहकांनी गाडीचे सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत. सीटबेल्ट अवश्य बांधावा, अपात्र किशोरवयीन मुलांना वाहन चालविण्यास देऊ नये. तसेच रस्ते सुरक्षा मोहीम राबविण्याची जबाबदारी सर्वांचीच असून,आपण सर्वांनी त्याबाबत मन:पूर्वक योगदान द्यावे, असे आवाहन केले. सोबतच सदर मोहिमेअंतर्गत आगारातील संपूर्ण चालक, वाहक यांचे परवाने नूतनीकरण तपासणी करण्यात येणार असून, चालक, वाहक यांत्रिक व सर्व कर्मचार्‍यांची सर्वसाधारण संपूर्ण वैद्यकीय तपासणी, नेत्र तपासणी इत्यादी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व कर्मचारी व प्रवाशांना रस्ते सुरक्षा विषयक माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहक पुसनाके यांनी केले तर राजकिरण नेम्मानीवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यशाळा अधीक्षक यशवंत खिल्लारे, वरिष्ठ लिपिक सुधीर डुबेवार, विजय परसोडे, गजेंद्र दासरवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी सर्व वाहक,चालकासह आगारातील सर्व कर्मचारी व शहरातील नागरिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages