राजगड येथील ‘प्रियदर्शनी’ विमान धावपट्टीचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता किती ? - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 29 January 2023

राजगड येथील ‘प्रियदर्शनी’ विमान धावपट्टीचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता किती ?

किनवट. दि.29 (प्रतिनिधी) : किनवट तालुक्यातील राजगड येथे 1980 च्या दशकात  प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘प्रियदर्शनी’नावाच्या विमान धावपट्टीचे काम नव्याने पूर्ण करून देऊत, अशी घोषणा दीड वर्षापूर्वी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी किनवट येथील  नवीन प्रशासकीय इमारतीच्या ई-लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केली होती. तसेच खासदार हेमंत पाटील यांनीही सदरील विमानाची धावपट्टी पुन्हा कार्यान्वित करून त्याचे विमानतळात रुपांतर करण्यात येऊन येथे हवाई सुंदरी आणि वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, अशी मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली होती. जिल्ह्यातील दोन सबळ नेत्यांनी दिलेले आश्वासन दोन वर्ष उलटूनही पूर्णत्वास गेले नाही. या विमानतळाच्या निमित्ताने सक्षम तरुणाईला काही काम,नोकरी, प्रशिक्षण मिळण्याची जी आशा निर्माण झाली होती, ती फोल ठरल्याचे दिसत आहे.


          1980 च्या दशकात दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात किनवट तालुक्यातील जवराला आणि बुधवारपेठ या गावातील आदिवासी बांधवांनी आदिवासी समाजाचे प्रसिद्ध असे ‘ढेमसा’ लोकनृत्य  अतिशय सुंदर व कलात्मकरित्या सादर केले होते. त्यावेळी पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांना ते नृत्य आवडल्याने त्यांनी या दोन्ही गावांना भेट देऊन ही आदिवासी संस्कृती, त्यांची जीवनशैली जाणून घेण्याचा आणि  सहभागी कलाकारांना भेटण्याचा  मनोदय  व्यक्त केला होता. त्यावेळी काँग्रेसचे खासदार येथील उत्तमराव राठोड हे होते.  श्रीमती इंदिरा गांधी येणार असल्याने त्यांचे विमान किंवा हेलिकॉप्टर जवळपासच्या भागात  उतरावे आणि त्यांना या   दोन्ही गावांना त्वरित जाता यावे म्हणून जवळचा पर्याय  राजगड असल्याने, त्याठिकाणी वन विभागाच्या जमिनीवर  ऐंशीच्या  दशकात   रोजगार हमीच्या कामावरील  मजुरांच्या साहाय्याने धावपट्टी तयार करण्यात येऊन, त्याला ‘प्रियदर्शनी’ (इंदिरा गांधीचे नाव) हे नाव देण्यात आले. रंगीत तालीम म्हणून एका हेलीकॉप्टरमध्ये दोन-तीन प्रवाशांसह उड्डानाचे एक दिवसीय प्रात्यक्षिकही स-शुल्क पार पडले. मात्र पुढे काही कारणास्तव इंदिरा गांधी यांचा नियोजित दौरा रद्द झाला. नंतरच्या काळात अनेक राजकीय घडामोडीनंतर   या धावपट्टीची शासन दरबारी केवळ कागदोपत्री नोंद करण्यात आली. पुढे या धावपट्टीबाबत 2021 पर्यंत कुठल्याही राजकीय पुढार्‍याने प्रश्नच उपस्थित केला नाही,÷त्यामुळे हे ठिकाण आहे त्या स्थितीमध्ये उपेक्षित राहीले.


         दीड वर्षापूर्वी किनवट येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या ई-लोकार्पण सोहळयात किनवट व माहूर तालुक्यात महसूली सेवा सुविधा गतीमान पध्दतीने पोहचाव्यात,यासाठी किनवट येथील नवीन प्रशासकीय इमारत महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास त्यावेळचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केल्यानंतर त्यांनी या आदिवासी भागाला आपात्कालीन प्रसंगी तत्काळ संपर्क करता यावा, यासाठी राजगड येथे उपलब्ध असलेल्या विमानतळाच्या धावपट्टीचे काम नव्याने पूर्ण करुन देऊत, अशी घोषणा  केली होती.


          या सोबतच खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या खासदार पदाची धुरा हाती घेतल्यानंतर राजगड येथे भेट दिली होती. तेव्हापासून या धावपट्टीला पुन्हा कार्यान्वित करून त्याचे विमानतळामध्ये रुपांतर करावे, सोबतच याठिकाणाहून  विमान वाहतूक सुरू करण्याची इच्छा त्यांच्या मनात होती. त्या अनुषंगाने त्यांनी जुलै 2021 मध्ये केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधीया)यांची भेट  घेऊन त्यांना या भागाची आणि संबंधित धावपट्टीची पार्श्वभूमी सांगितली आणि याठिकाणी पुन्हा ही धावपट्टी सुरू करून त्याचे विमानतळामध्ये रूपांतर करावे. तसेच  वैमानिक आणि हवाई सुंदरींचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे, जेणेकरून या भागातील आदिवासी बहुल समाजातील तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध होईल,  असे सूचक वक्तव्य करून त्यांनी या धावपट्टीचे पुनरुज्जिवन करण्याची मागणी केली होती.


       याठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 80 च्या दशकात मराठवाड्यात औरंगाबादनंतर कुठेच विमानतळ नव्हते आणि  नांदेड जिल्ह्यातील  ही पहिलीच धावपट्टी होती. नांदेडचे विमानतळ यानंतर तयार करण्यात आले होते.हे विशेष. हे विमानतळ म्हणून कार्यान्वित करण्यात आल्यास, विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, आणि संबंध हिंगोली लोकसभा मतदारसंघा सोबतच तेलंगणातील आदिलाबाद, निझामाबाद,निर्मल या ठिकाणच्या जनतेलाही सोयीचे होऊन विमानसेवेचा मार्ग सुकर होईल. तसेच आपात्कालीन प्रसंगी गडचिरोली आणि किनवट मधील नक्षलग्रस्त भागात केंद्रीय राज्य राखीव जवानांच्या (सीआरपीएफ ) तुकड्या तातडीने उतरविण्याकरिता या विमानतळाचा उपयोग होऊ शकतो, असेही खासदार हेमंत पाटील त्यावेळी म्हणाले. महत्वाचे म्हणजे यामुळे किनवट आणि आजूबाजूच्या परिसरासह संबंध हिंगोली लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होऊन  पर्यायाने मतदारसंघाचा विकास व्हावा, असा त्यांचा मानस होता. मात्र, ह्या सर्व गोष्टी अखेर दिवास्वप्नच ठरल्यात.


       दुर्गम,डोंगराळ व आदिवासी बहुल किनवट तालुक्यात कुठलेही मोठे उद्योगधंदे, कारखाने नसल्यामुळे तरुणाईस कामधंद्यासाठी आपला तालुकाच सोडावा लागतो. येथील एमआयडीसीची जमीन कुठल्याही उद्योग वा कारखान्याविना अनेक वर्षापासून ओसाड आहे. अनेक वर्षापूर्वी पैनगंगा साखर कारखान्याचे गाजर दाखवून  शेतकऱ्यांकडून गोळा केलेली शेअर्सची रक्कम कुठे गेली? याचा तपशील जनतेसमोर कधीच आलेला नाही. मराठवाड्यातील एकमेव अशी आदिवासी सहकारी  सूत गिरणी जलधरा येथे उभारण्यासाठी तत्कालीन आमदार किशनराव पाचपुते यांच्या पुढाकारातून  संपूर्ण  इफ्रास्ट्रक्चर उभारल्या गेल्यानंतर कुठे माशी शिंकली काही कळलेच नाही. ती सूतगिरणी सुरू होण्यापूर्वीच बंद पडली. आता तेथील सर्व इमारती ओसाड अन्‌ भग्न झाल्यात. त्यातील सर्व यंत्रसामुग्री, दरवाजे, खिडक्या, पंखे आदी सर्व साहित्य चोरीस गेले. कोट्यावधी रुपयांचा चुराडा झाला. हे सर्व निराशाजनकच आहे. त्यामुळे तालुक्यातील शेकडो बेरोजगार तरुणांसाठी हमखास रोजगार मिळवून देणार्‍या मोठ्या उद्योगधंद्यांची उभारणी करण्यासाठी सक्षम राजकीय महत्वाकांक्षेसह ती पूर्णत्वास नेणाऱ्या जिद्दीचीही गरज असल्याचे लक्षात येते.


      


 


 

Subject:  सुधारीत बातमी :  राजगड येथील ‘प्रियदर्शनी’ विमानतळाचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता किती ? 28.01.2023
राजगड येथील ‘प्रियदर्शनी’ विमानतळाचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता किती ?


किनवट. दि.25 (प्रतिनिधी) : किनवट तालुक्यातील राजगड येथे 1980 च्या दशकात  प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘प्रियदर्शनी’नावाच्या विमान धावपट्टीचे काम नव्याने पूर्ण करून देऊत, अशी घोषणा दीड वर्षापूर्वी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी किनवट येथील  नवीन प्रशासकीय इमारतीच्या ई-लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केली होती. तसेच खासदार हेमंत पाटील यांनीही सदरील विमानाची धावपट्टी पुन्हा कार्यान्वित करून त्याचे विमानतळात रुपांतर करण्यात येऊन येथे हवाई सुंदरी आणि वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू करावे, अशी मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली होती. जिल्ह्यातील दोन सबळ नेत्यांनी दिलेले आश्वासन दोन वर्ष उलटूनही पूर्णत्वास गेले नाही. या विमानतळाच्या निमित्ताने सक्षम तरुणाईला काही काम,नोकरी, प्रशिक्षण मिळण्याची जी आशा निर्माण झाली होती, ती फोल ठरल्याचे दिसत आहे.No comments:

Post a Comment

Pages