किनवट पोलीस ठाण्यामध्ये गत वर्षभरात गुन्ह्यांच्या संख्येत झाली घट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 17 January 2023

किनवट पोलीस ठाण्यामध्ये गत वर्षभरात गुन्ह्यांच्या संख्येत झाली घट

किनवट,दि.17(प्रतिनिधी) :  येथील पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या 2022 चे पूर्ण वर्षभरातील क्राईम रेकार्ड पाहता  गुन्ह्यांच्या संख्येत घट झालेली दिसून येत असून, 2021 च्या तुलनेत प्रत्यक्ष खून व दंगा वगळता खुनाचा प्रयत्न, बलात्कार, चोरी, घरफोडी,  ठकबाजी, पळवून नेणे, विनयभंग,  दुखापत आणि जुगार या सारख्या गुन्ह्यांचे प्रमाण बरेचसे कमी झालेले आहे.


       तालुक्यात किनवट, मांडवी व इस्लापूर  ही तीन पोलीस ठाणी आहेत. किनवट पोलीस ठाण्यात मंजूर पदापेक्षा प्रत्यक्षात कमी पोलीसबळ कार्यरत असल्यामुळे, शहर व ग्रामीण भागाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील 191 गावांपैकी 72 गावच्या सुमारे दीड लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी एकट्या किनवट ठाण्यावर आहे.


       जानेवारी ते डिसेंबर 2022 या काळात किनवट पोलीस ठाण्यामध्ये भाग 1 ते 5 अंतर्गत विविध स्वरूपाचे एकूण 122 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी 89 गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच भाग-6 अंतर्गत (यात जुगार,दारू,अनैतिक व्यापार,अन्नभेसळ,मोटारवाहन,सावकारी आदी कायदे येतात) एकूण 137 गुन्हे दाखल झालेले आहेत. ते सर्वच्या सर्व उघडकीस आले आहेत.  गतवर्षी अर्थात 2022 मध्ये सदोष मनुष्यवध, जबरी चोरी, हुंडा बळी, अन्यायाने विश्वासघात, बनावट नोटा, आत्महत्या वा तसा प्रयत्न या सारखी एकही घटना घडलेली नाही. जे गुन्हे दाखल झालेत त्यामध्ये खून 5, खुनाचा प्रयत्न 1, बलात्कार 4, दरोडा 1, दरोड्याची तयारी 1,  रात्रीची फरफोडी 8, दिवसा घरफोडी 2, इतर सर्व चोर्‍या 27, दंगा 10,  ठकबाजी  6, घराविषयी आगळीक 2, अपक्रिया 3, पळवून नेणे 4, दुखापत 22, सरकारी नोकरावर हल्ला 2, विनयभंग 6, निष्काळजीपणे वाहन चालवताना मृत्यू  2 तर इतर भारतीय दंड विधान अधिनियम 1 ते 5 प्रमाणे 16 असे एकूण 122 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी 89 गुन्हे उघडकीस आलेले आहेत तर 33 गुन्हे उघडकीस यावयाचे आहेत. सन् 2021 च्या तुलनेत 2022 साली भाग 1 ते 5 मध्ये 76 गुन्हे आणि भाग 6 मध्ये 65 गुन्हे  कमी घडलेले आहेत.


      2021 साली भाग 1 ते 5 मध्ये एकूण 198 गुन्ह्यांची नोंद किनवट पो.स्टे.ला झाली होती. त्यापैकी 143 गुन्हे उघडकीस आले होते. भाग 6 अंतर्गत 202 गुन्हे घडले होते. त्या सर्वांचा निपटारा झालेला आहे.  2021 मध्ये  सदोष मनुष्य वध, दरोड्याची तयारी, हुंडाबळी, बनावट नोटा,  घराविषयी आगळीक, आत्महत्या वा प्रयत्न अशी एकही घटना घडलेली नव्हती. 2021 मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात  खून 2, खुनाचा प्रयत्न 4, बलात्कार 5, दरोडा 1, जबरी चोरी 2, रात्री घरफोडी 11, दिवसा घरफोडी 1, सर्व चोऱ्या 55, दंगा 4, अन्यायाने विश्वासघात 1, ठकबाजी 15,पळवून नेणे 5,  अपक्रिया 3, दुखापत 39, सरकारी नोकरावर हल्ला 9,  विनयभंग 9,  निष्काळजीपणे वाहन चालवताना मृत्यू 5,  इतर भा.द.वी. 27 अशा एकूण 198 गुन्ह्यांची नोंद किनवट पो.स्टे.ला झालेली होती.


        2022 पेक्षा 2021 मध्ये खुनाच्या प्रयत्नांच्या 3, बलात्काराची एक, जबरी चोरी 2, रात्री घरफोडीच्या 3, सर्व चोऱ्यांच्या 28, ठकबाजीच्या 9, पळवून नेण्याची एक, दुखापतीच्या 17, सरकारी नोकरांवर हल्ला 7, विनयभंगाच्या 3  तर निष्काळजीपणे वाहन चालवताना मृत्यूच्या 3 आणि भादवी 1 ते 5 मध्ये 11 घटना अधिक घडलेल्या होत्या.


    “मागील वर्षांच्या तुलनेत 2022 मध्ये गुन्ह्यांचे प्रमाण कमी तर झालेच, सोबतच गुन्हे उघडकीस येण्याच्या प्रमाणातही वाढ झालेली आहे. मात्र यामध्ये न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण किती हे पाहणेही महत्वाचे ठरते. गतवर्षात किनवट पो.स्टे.अंतर्गत पाच मर्डर झालेत. त्यात पार्डी खुर्द येथे संशयावरून नवर्‍याने बायकोचा केलेला खून, नंतर रामनगर येथे बाप-लेकाचे भांडण सोडविण्यास गेलेल्या शेजार्‍याचा लेकाने रागाच्या भरात केलेल्या वारांमुळे झालेला नाहक मृत्यू, पुढे बोधडी येथे न्हाव्याकडे दाढी करतांना झालेल्या बाचाबाचीवरून न्हाव्याने केलेली ग्राहकाची हत्या व नंतर चिडलेल्या जमावाने न्हाव्याला  मारून संपविले. अखेरच्या डिसेंबर महिन्यात जमिनीच्या वादातून दोन व्यापार्‍यांना झालेल्या मारहाणीत एका व्यापार्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू. या पाच खुनांच्या घटनांमध्ये मारणारे हे सराईत गुन्हेगार नव्हते. संशय  आणि तीव्र संतापामुळे मनावरील सुटलेल्या नियंत्रणातून या घटना घडलेल्या आहेत. 31 मार्च 22 ला बसस्थानक परिसरातील एकाच रात्री झालेल्या चार चोर्‍यांचा छडा आठ दिवसात लावणे आणि जुलै 22 च्या अखेरीस विदर्भातून किनवट येथे रात्रीच्या वेळी सर्व शस्त्रांस्त्रासह दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीस शिताफीने जेरबंद केल्यामुळे पोलिंसांच्या कामगिरीत मानाचा तुरा रोवल्या गेलेला आहे.”

No comments:

Post a Comment

Pages