सौर पथदिवे कामाची चौकशी करुन दोषी विरुध्द कडक कार्यवाही करण्यात यावी: 'सेक्युलर मुव्हमेंट', ची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 7 February 2023

सौर पथदिवे कामाची चौकशी करुन दोषी विरुध्द कडक कार्यवाही करण्यात यावी: 'सेक्युलर मुव्हमेंट', ची मागणी

किनवट,ता.७(बातमीदार): शहरातील   प्रभाग क्र. १ मध्ये बसविण्यात आलेल्या सौर पथदिवे कामाची चौकशी करुन दोषी विरुध्द कडक कार्यवाही करण्यात यावी,या मागणीचे निवेदन "सेक्युलर मुव्हमेंट", या संघटनेच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी, नगर परिषद कार्यालय, किनवट यांना नुकतेच देण्यात आले आहे.

 निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील प्रभाग क्र. एक (रामनगर) मध्ये खालच्या दर्जाचे सौर पथदिवे बसविण्याचे अंदाजीत ८२ लाख रुपये किंमतीचे काम करण्यात आले आहे. सदरील काम हे अंदाजपत्रकाप्रमाणे करण्यात आलेले नाही. सदरील कामातील पोलची जाडी कमी आहे, ती अंदाजपत्रकाप्रमाणे नाही. या कामातील तीन पथदिवे हे एका शेतकऱ्याच्या शेतातील फॉर्म हाऊसवर बसविण्यात आलेले आहे. या कामातील पोलला पुरेसे क्युरिंग करण्यात आलले नाही. या कामात पोल बसवतांना दोन फुट (२४ इंच) खड्डा करायला पाहीजे होता, परंतु प्रत्यक्षात तो खड्डा ६ इंचचा खोदण्यात आलेला आहे.

    या कामातील सौर दिवे खालच्या दर्जाची असल्याने त्यांचा प्रकाश फारच मंद पडत आहे. या कामात मातीमिश्रीत सिमेंटचा वापर करण्यात आलेला आहे. या कामांतर्गत बोड्डेम्मा रोडवर नागरी वस्ती नसतांनाही तेथे पथदिवे बसविण्यात आलेले आहेत. या कामातील ४९५ पथ दिव्यापैकी काही पथदिवे हे सुरुच झालेले नाहीत, तर काही खांब हे जमिनदोस्त झालेले आहेत. या कामाचे टेंडर हे प्रत्यक्षात मे.इलेक्ट्रॉ सोलार सिस्टीम, कोरेगाव जि.सातारा यांच्या नांवे असले तरी प्रत्यक्षात सदरील काम हे त्या प्रभागाचे नगरसेवक व तत्कालीन उपाध्यक्ष यांनीच केलेले आहे.

 सदरील कामाची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येवून दोषी विरुध्द कडक कार्यवाही करण्यात यावी. तसेच त्या कंपनीला काळया यादीत टाकण्यात यावे,असेही निवेदनात शेवटी नमूद करण्यात आले आहे.

निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व

नगरविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य यांना पाठविण्यात आल्या आहेत.निवेदनावर 'सेक्युलर मुव्हमेंट',या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


No comments:

Post a Comment

Pages