बहुगुणी रसदार ताडगोळे किनवटच्या बाजारपेठेत दाखल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 16 April 2023

बहुगुणी रसदार ताडगोळे किनवटच्या बाजारपेठेत दाखल

किनवट,दि.15 (प्रतिनिधी) : वाढत्या उकाड्याने सर्वजण हैराण होत असतांना किनवटच्या बाजारपेठेत ताडगोळे (ताडीमुंजलू) दाखल झाले आहेत. उन्हाच्या दाहतेवर ताडगोळे हे नैसर्गिक रामबाण उपाय असल्यामुळे, 50 रूपयाला चार असे थोडे महाग पडत असूनही नागरीक या ताडगोळ्यांचा आनंदाने आस्वाद घेत आहेत.


    आपण उन्हाळ्यात टरबूज, खरबूज, काकडी, लिची, द्राक्षं, आंबा आदी फळे खात असूत. मात्र उन्हाळ्यात हे पारदर्शक व पांढऱ्या जेलीसारखे दिसणारे व चवीला हलकेसे गोड असणारा ताडगोळा खाण्यातील मजाच वेगळी आहे. ताडगोळा हा अनेक आजारांवर सुद्धा फायदेशीर ठरतो. ताडगोळे चवीला गोड असून प्रकृतीला थंड असतात. हे एक पाणीदार फळ असल्यामुळं ते कापायची गरज नसते. या फळाची प्रवृत्ती थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खाल्ल्यास आरोग्यासाठी ते हितकरच आहे. ताडगोळे हे अतिशय मऊ आणि रसदार असतात. त्यांच्यावर जाड साल असतं. ही सालं काढणं एक फार मोठं कंटाळवाणं काम आहे. मात्र एकदा का साल काढली तर आत रसदार पांढरे गरे म्हणजेच    ‘ताडगोळे’असतात.

       ताडाच्या झाडाला येणारं फळ म्हणजेच ‘ताडगोळा’. याचं शास्त्रीय नाव ‘बोरासस फ्लॅबिलिकर’ असं आहे. ताडाच्या झाडांची लागवड समुद्रकिनारी अधिक होते. ताडगोळ्यांना बंगालमध्ये याला ‘ताल’, तेलुगूत ‘ताडी मुंजलू’, तमिळमध्ये 'नुग्नू' इंग्रजीत 'आईस ॲपल' तर हिंदीमध्ये 'तारी' या नावानं ओळखले जाते.


         ताडगोळ्यांमधील घटकामध्ये खनिज, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि जीवनसत्व ए, बी, सी हे आढळते. एकंदरीतच हे फळ शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. ताडगोळ्यांच्या सेवनामुळे ‘इम्युनिटी सिस्टिम’ मजबूत होण्यास मदत होते.  ताडगोळ्यांमुळे शरीरातील पाण्याच्या पातळीसह, साखरेची पातळीही संतुलीत राहते. यामुळे शरीराचं तापमानही नियंत्रणात राहते.  ताडगोळ्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशिअम आणि फायबरचा साठा असतो. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रत्येकाने या फळाचं सेवन आवर्जून करावे. कारण उष्णतेमुळे होणारी पोटातील जळजळ याने कमी होते. उन्हामुळे लहान मुलांना आणि मोठ्यांना अनेकदा त्वचेवर पुरळ येतात, ॲलर्जी होते अशावेळी ताडगोळ्यांचा रस त्वचेवर पुरळांवर लावल्यास आराम मिळतो. उन्हाळ्याच्या अनेकांना उन्हाळी लागते अशावेळी ताडगोळे खाल्ल्यास आराम मिळतो. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. कांजिण्या आलेल्या रुग्णांनी ताडगोळे खावेत. त्यामुळे कांजण्यांनी शरीराला येणारी खाज कमी होते. ताळगोळे खाल्ल्याने अधिक भूक लागत नाही, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येते. ताडगोळे आपण फ्रीजमध्ये साठवून ठेवू शकतो. साल न काढता फ्रीजमध्ये ठेवल्यास ताडगोळे अनेक दिवस टिकतात. उन्हाळ्यात मुलांच्या बाहेर खेळायला पाठविण्यापूर्वी हे फळ खाऊन पाठवावे. किडनीच्या आरोग्यासाठी ताडगोळे अतिशय उपयुक्त असून शरीरातील नको असलेली द्रव्ये याच्या सेवनाने शरीराबाहेर फेकली जातात.

No comments:

Post a Comment

Pages