किनवट : तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या ८७ प्रभागाचे ८५ सदस्य आणि २ सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी (ता.२) नामांकनपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी सदस्यपदासाठी एकूण ६५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, तालुक्यातील निराळा तांडा व सक्रुनाईक तांडा ग्रा.पं.च्या सरपंचपदासाठी कुठलाही अर्ज न आल्यामुळे, पुन्हा ह्या जागा रिक्तच राहाणार असल्याची माहिती तहसीलच्या निवडणूक विभागाकडून देण्यात आली.
राज्य निवडणूक आयोगाने निधन, राजीनामा, अनर्हता व अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य, थेट सरपंचाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम ता.६ एप्रिल रोजी जाहीर केला होता. त्यानुसार किनवट तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या ८७ प्रभागांतील ८५ सदस्यांसोबतच निराळा तांडा व सक्रुनाईक तांडा येथील थेट सरपंचासाठी निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. ता.२५ ते एप्रिल ते २ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. या दरम्यान ता.२९ व ३० एप्रिल तसेच १ मे ची सार्वजनिक सुट्टी होती. राज्य निवडणूक आयोगाने राखीव जागेसाठी पोटनिवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रासोबतच सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट ठेवली आहे. या अटीमुळे उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ २ मे ही अखेरची तारीख असतांना गेल्या चार दिवसात ४७ ग्रा.पं.च्या ८५ सदस्यांच्या जागांसाठी केवळ ६५ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
त्यातील आंजी, पांगरपहाड, चिंचखेड, जलधारा, पांधरा, भीमपूर, देवलानाईकतांडा, पिंपरी, बुधवारपेठ, सिंगोडा, राजगडतांडा, कोठारी सी. सावरी, उमरीबाजार या १४ ग्रामपंचायतींच्या १८ सदस्यपदाच्या जागेसाठी प्रत्येकी केवळ एकच अर्ज आल्यामुळे या १८ जागा बिनविरोध निवडल्या जाणार आहेत. तसेच ४७ पैकी आमडी, भंडारवाडी, पार्डी सी, आंदबोरी ई.,चिखली ई.,रामपूर, फुलेनगर, मलकजाम, तोटंबा, मारेगाव वरचे, दाभाडी, दहेलतांडा, बेंदी, बेंदीतांडा, पांधरा, वाळकी बु.,सावरी, आंजी, बुधवारपेठ, सक्रुनाईकतांडा व निराळातांडा या २१ ग्रा.पं.मधील दोन सरपंच व ४८ सदस्यपदांसाठी एकही नामांकन अर्ज न आल्यामुळे या सर्व जागा पुन्हा रिक्तच राहणार आहेत.
दरम्यान, ग्रा.पं.निवडणुकीच्या टप्प्यात सक्रुनाईकतांडा व निराळा तांडाचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. परंतु, गावात अनुसूचित जमातीचा उमेदवारच नसल्याने, तेथील सरपंचपद रिक्त होते. आता पोटनिवडणुकीतही तीच स्थिती असल्याने तेथील सरपंचपद पुन्हा रिक्तच राहाणार असून, निवडणूक आयोग यातून काय मार्ग काढेल, याकडे गावकऱ्यांचे लक्ष आहे. त्यात सक्रुनाईक तांडाच्या ग्रामस्थांनी दुसऱ्या टप्प्यातील मतदानावर बहिष्कार टाकला होता. आता पोटनिवडणुकीतही त्यांनी बहिष्कार कायम ठेऊन सरपंचपदासह सदस्यांसाठीही नामांकनपत्र भरलेले नाही.
या पार्श्वभूमीवर पिंपळगाव सी., आंदबोरी चि., दिग्रस, अंबाडी, दहेली, चिखली बु., दिगडीमंगाबोडी, बेल्लोरी ज., येंदापेंदा, मलकापूर खेर्डा, मांडवा कि., कोपरा, लिंगी, माळबोरगाव, अप्पारावपेठ या १५ ग्रामपंचायतींच्या १९ सदस्यपदांच्या जागेसाठी संभाव्य निवडणूक होण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता.८) ला अर्ज मागे घेण्याचा दिवस असून, त्यात किती अर्ज मागे घेण्यात येतील यावर अखेर किती जागेसाठी लढत होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. मतदान ता.१८ मे तर मतमोजणी ता.१९ मे रोजी होणार आहे.
पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी ता.२८ रोजी येथील तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ.मृणाल जाधव, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार मो.रफीक, लिपीक नितीन शिंदे, मल्लीकार्जुन स्वामी, मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांच्या उपस्थितीत ३०० कर्मचाऱ्यांना पहिले निवडणूक प्रशिक्षण देण्यात आले.
No comments:
Post a Comment