“बोलतो मराठी, गर्जतो मराठी” या बहारदार कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने ; जिल्ह्यात सांस्कृतिक व लोकोत्सवाचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 2 May 2023

“बोलतो मराठी, गर्जतो मराठी” या बहारदार कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने ; जिल्ह्यात सांस्कृतिक व लोकोत्सवाचे आयोजन

नांदेड  दि. 2 :- मराठवाडा मुक्तिसंग्रामचा चळवळीचा समृद्ध वारसा आपल्या जिल्ह्यातील अनेक गावांनी जपला आहे. अनेक लोकांनी मराठवाडा मुक्तिसाठी दिलेले योगदान, सोसलेले कष्‍ट, दिलेले बलिदान जोपर्यंत नव्या पिढीपर्यंत पोहचणार नाहीत तोपर्यंत त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ लक्षात येणार नाही. यादृष्टीने मराठवाडा मुक्तिच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत जिल्ह्यातील कल्लाळी, इस्लापूर, उमरी, अर्जापूर सारख्या ऐतिहासिक ठिकाणी आपण विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहोत. यात लोकांचा अधिकाधिक सहभाग वाढावा यादृष्टिने काही सूचना असतील तर समिती त्याचे स्वागत करेल, असे प्रतिपादन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.  


मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी “बोलतो मराठी, गर्जतो मराठी” कार्यक्रमाचे कुसूम सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, चैतन्यबापू देशमुख, प्रवीण साले आदी मान्यवर उपस्थित होते. 


महाराष्ट्राची लोकधारा ही प्रतिभा संपन्न आहे. लोककलेतील अनेक माध्यमांनी स्वातंत्र्य लढ्यापासून विविध चळवळींना आकार दिला. लोकसाक्षरतेसाठी हा धागा खूप महत्त्वाचा आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याचा इतिहास नव्या पिढी पर्यंत पोहोचविण्यासाठी वक्त्तृत्त्व स्पर्धा, कला महोत्सव, लोकोत्सव सारखे उपक्रम राबवू असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले. अमृत महोत्सवासाठी शासनाने नेमलेली समिती सर्व पक्षातील लोकांना घेऊन असल्याचे त्यांनी सांगितले.


मराठवाड्याला ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाखमोलाचा आहे. हा वारसा पुढे नेण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमाची जोड आवश्यक असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले. यावेळी प्रवीण साले यांनी मनोगत व्यक्त केले.


महाराष्ट्राची लोकसंस्कृती व लोकधारा यावर आधारित परंपरागत गीत-संगीत, नृत्य, मराठी परंपरा आणि कलागुणांचा अनोखा अविष्कार असलेला “बोलतो मराठी, गर्जतो मराठी” या बहारदार कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली. संवाद बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था नांदेड, आरती क्रिएशन छत्रपती संभाजीनगर आणि सोहम नाद-आळंदी-पुणे मधील कलावंत यांनी “बोलतो मराठी, गर्जतो मराठी” साकारला.  पत्रकार विजय जोशी व सहकारी कलावंतांनी नटरंग मधील गीताच्या बहारदार सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरूवात केली. गजानन पिंपरखेडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



No comments:

Post a Comment

Pages