नांदेड : येथील सत्यशोधक विचार मंच आणि मानव विकास सेवाभावी व संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित 'संघटित बनो, संघर्ष करो..!' या राज्यस्तरीय परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी दलित पँथर चळवळीतील अग्रणी नेतृत्व एन. डी. गवळे यांची, तर निमंत्रकपदी डॉ. साहेबराव ढवळे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती सत्यशोधक विचार मंचाचे अध्यक्ष कोंडदेव हटकर आणि मानव विकास सेवाभावी व संशोधन संस्थेचे राज गोडबोले यांनी दिली. यावेळी अॅड. बी. जे. हटकर, प्रभुजी ढवळे, सत्यशोधक विचार मंचाचे सचिव श्रावण नरवाडे, सुभाष सूर्यतळे, अनुरत्न वाघमारे, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रणजित गोणारकर, रमेश कसबे, एन. टी. पंडित यांची उपस्थिती होती.
आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळीतील ज्वलज्जहाल दलित पँथर या चळवळीच्या सुवर्ण महोत्सवी सांगता वर्षा निमित्ताने तसेच अनुसूचित जाती जमातीवरील वाढत्या अन्याय अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय राज्यस्तरीय परिषद शहरात संपन्न होत आहे. या परिषदेत चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा कार्यकर्ते, विविध संस्था, संघटना तसेच अभ्यासक, विचारवंत सहभागी होणार आहेत. याच परिषदेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. ही परिषद आंबेडकरी चळवळीतील विचारधारेचा आशय मजबूत करुन समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत वैचारिक अभिसरण करेल अशी अपेक्षा यावेळी गवळे यांनी व्यक्त केली. या परिषदेच्या यशस्वी संयोजनासाठी संयोजन समितीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
No comments:
Post a Comment