औरंगाबाद (प्रतिनिधी ) :
विद्यमान परिस्थितीत आपल्या देशाचे शैक्षणिक धोरण दिशाहीन आणि कुचकामी असल्यामुळे आगामी २५ वर्षात आपला बहुजन कष्टकरी, शोषित समाज पुन्हा गुलामगिरीच्या विळख्यात सापडलेला असेल, अशी भीती व्यक्त करणारे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक तथा समीक्षक प्रा.डॉ.ऋषिकेश कांबळे यांनी पुरस्कार वितरण प्रसंगी केले.
औरंगाबाद येथील मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात दि.२९ रोजी दुपारी १ ते ४ यावेळेत 'निळे प्रतिक' बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा वर्धापनदिन व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून डॉ.सतीश गायकवाड यांची उपस्थिती होती, तर अध्यक्षस्थानी पी.बी अंभोरे हे होते. प्रमुख अतिथी प्रा.डॉ.ऋषिकेश कांबळे हे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, १९२३ मध्ये देखील ब्रिटिश सरकारने सरकारी शाळा लोकल बोर्डाकडे हस्तांतरीत केल्या होत्या, या निर्णयाची झळ बहुजन वर्गाला सहन करावी लागली. आज १०० वर्षानंतर शिक्षणाची स्थिती अत्यंत केविलवाणी बनलेली आहे. सध्याचे शैक्षणिक धोरण हे बहुजन वर्गाच्या भवितव्यासाठी हानिकारक असल्यामुळे बहुजन वर्ग आगामी २५ वर्षात गुलामगिरीत अडकलेला असेल,अशी भीती प्रा. डॉ.कांबळे यांनी व्यक्त केली व म्हणाले की, शिक्षणाचे महत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तसेच महात्मा फुले,शाहू महाराजांनी ओळखलेले होते. शिक्षण प्रसारासाठी या महापुरुषांनी यशस्वी प्रयत्न केले. डॉ.आंबेडकरांनी अनेकांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केलेले होते. बहुजन वर्गाने पुढील धोका लक्षात घेऊन सावध झाले पाहिजे, असा इशाराही डॉ. कांबळे यांनी दिला. वृत्तपत्राच्या भूमिकेविषयी बोलताना डॉ. कांबळे म्हणाले की, वृत्तपत्र हे चळवळीचे एक शस्त्र आहे, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मानत असत. 'मूकनायक' या वृत्तपत्रासाठी राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळात तीनशे रुपयांची धनराशी देऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भरीव मदत केलेली होती. शाहू महाराज यांनी ही मदत सामाजिक जाणिवेतून केलेली होती, याची आठवण डॉ.कांबळे आपल्या भाषणातून करून देत म्हणाले की, संपादक रतनकुमार साळवे यांनी 'निळे प्रतिक' हे वृत्तपत्र सुरू करून ते टिकवण्याचे जे धाडस दाखवले ते अत्यंत उल्लेखनीय आहे.
निळे प्रतिक पंधराव्या वर्षात पदार्पण करीत आहे, हे सत्य अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. निळे प्रतिक वृत्तपत्राची भरभराट होऊन ते दैनिकात रूपांतरीत व्हावे, मी स्वतः 'निळे प्रतीक' कडे सामान्यपणे बघत नसून या वृत्तपत्राकडून खूप अपेक्षा आहेत असे उद्गार डॉ.कांबळे यांनी काढले.
कार्यक्रमाचे प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विचार पीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला आपल्या प्रास्तविकपर मनोगतात रतनकुमार साळवें यांनी सांगितले की, वृत्तपत्र चालविताना व एखादा कार्यक्रम आयोजित करताना किती दमछाक होते याचा अनुभव मी गेल्या १४ वर्षापासून घेत आहे. अनेक समाज बांधवांनी आपणास या कामी मोठी साथ दिलेली असल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंबादास रगडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर व भूमिकेवर भाष्य करतांना सामाजिक न्यायाचा व समतेचा रथ पुढे नेता येत नसेल तर, किमान हा रथ मागे जाणार नाही असे काही काम करू नका, अशी तळमळ रगडे यांनी उपस्थितांसमोर मांडली. शिक्षणाचे तीन तेरा वाजले असल्याची खंतही रगडे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कार्थी डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी संपादक रतनकुमार साळवे यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाचा आवर्जून उल्लेख करत निळे प्रतीकच्या सांस्कृतिक वाटचालीचा आढावा घेतला. भीमटेकडी बुद्धविहाराच्या प्रा.धम्मदर्शना महाथेरी यांनी आपल्या मनोगतात संपादक रतनकुमार साळवे यांच्या वृत्तपत्राच्या प्रदीर्घ वाटचालीवर प्रकाश टाकून संपादकांना कराव्या लागणाऱ्या संघर्षाची काही उदाहरणे त्यांनी दिली. बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ग्रंथलेखन करणारे धनराज गोंडाणे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मी स्वतः निळे प्रतिकच्या शीर्षकामुळे प्रभावित झालो आणि या वृत्तपत्रास आपण मदत केली पाहिजे हा विचार कृतीत आणला, कारण निळे प्रतीक सारखी वृत्तपत्रेच सामाजिक चळवळीचा आधार असतात म्हणून समाजाने दातृत्व जपले पाहिजे असे मत गोंडाणे यांनी व्यक्त केले.
आपल्या मनोगतात सतीश गायकवाड म्हणाले की, निळा रंग हा सर्वसमावेशक आहे यावरूनच निळे प्रतीकच्या वाटचालीचा अंदाज येतो. संपादक उच्चशिक्षित असून उत्कृष्ट काम करत आहेत. समाजातील अनेक घटनांचे ते साक्षीदार आहेत. असे गायकवाड यांनी सांगितले .
यावेळी विचारपिठावरील मान्यवर न्यायाधीश शंकरराव दाभाडे, बाळुशेट आडगावकर यांनी रतनकुमार साळवे यांच्या कार्याचा गौरव करणारी आपली मनोगते व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात आंबेडकर बँकेचे अध्यक्ष पी.बी अंभोरे म्हणाले की,लोकशाही व्यवस्था टिकवायची असेल तर वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची ठरत असते. सध्याची स्थिती अत्यंत बिकट आहे. वृत्तपत्र सध्या मोठ्या दडपणाखाली असल्याने ही वृत्तपत्रे सरकारवर अंकुश ठेवू शकत नाहीत. वृत्तपत्राची मालकी भांडवलदारांकडे असल्याने ही भांडवलदारी वृत्तपत्रे सरकारची बाजू उचलून धरतात.असे सांगून अंभोरे म्हणाले की,आर्थिक बाजू कमजोर असल्यामुळे निळे प्रतीकला आपली वाटचाल सुरू ठेवणे कठीण झालेले आहे. एनडीटीव्ही या चॅनलचे उदाहरण ही सध्याची मोठी शोकांतिका असल्याचे सांगून अंभोरे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. रतनकुमार साळवे यांच्या कार्याचा गौरव करताना अंभोरे म्हणाले की, रतनकुमार यांचा जनसंपर्क मोठा असल्याने ते अनेकांशी जोडलेले संपादक आहेत. सेल्फ मोटिवेटेड संपादक आहेत, अशा शब्दात अंभोरे यांनी त्यांचा गौरव केला. सध्याच्या सरकारची वाटचाल ही जनहिताच्या दृष्टीने हानिकारक असून सार्वजनिक क्षेत्रही धोक्यात असल्याचे अंभोरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमात नियोजित ३० पुरस्कार्थींचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न पुरस्कार, साहित्यभूषण पुरस्कार, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, विद्रोही कवी नामदेव ढसाळ आदी पुरस्काराचे मान्यवरांच्या वितरण करण्यात आले या वर्धापनदिन व पुरस्कार वितरण कार्यक्रमास ज्येष्ठ नेते रतनकुमार पंडागळे, वरिष्ठ पत्रकार स.सो. खंडाळकर, माणिक साळवे, ज्ञानेश्वर खंदारे, मुकुंद दादा सोनवणे, पंडित बोर्डे, प्रा.भारत शिरसाट, दौलत मोरे, रशपालसिंग अटल, प्रा.अंकुश शिंदे, व्ही. के. वाघ, आनंद बोरडे,अॅड. एकनाथ रामटेके, लक्ष्मण भुतकर, गायिका कडुबाई खरात, मुकुंद सुरडकर, देविदास कोळेकर आर.बी.वानखेडे,सुधाकर आठवले,सुदाम मगर,लक्ष्मण भुतकर, आनंद बोरडे, बाजीराव सोनवणे,महेश मुरकुटे, बबन सोनवणे,संजय सोनखेडे,वसंत शिरसाट, गजानन इंगळे, भीमराव गाडेकर, सुधाकर निसर्गन, राजेश भोळे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज शिंदे यांनी केले तर आभार राहुल गवळी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल गवळी, टिनू साळवे, सोनू साळवे, सागर साळवे, अंश पवार, रतन गायकवाड, हिरासिंग महाले आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment