डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटला नवी झळाळी ; पन्नास वर्षांनंतर झाले सुशोभिकरण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 21 July 2023

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेटला नवी झळाळी ; पन्नास वर्षांनंतर झाले सुशोभिकरण

औरंगाबाद :

 दरवाजांचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या औरंगाबाद शहरात ’विद्यापीठ गेट’ हे स्वातंत्र्यानंतरचे जगभर पोहोचलेले शहरातील एकमेव प्रवेशद्वार आहे.तब्बल पन्नास वर्षांनंतर प्रवेशद्वाराचे सुशोभिकरण करण्यात आले असून माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते शनिवारी लोर्कापण होत आहे.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु प्रा.आर.पी.नाथ यांच्या कार्यकाळात मुख्य प्रवेशद्वार निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन अभियंता के.सी.छाबडा यांनी अवघ्या ३५ दिवसांत ’लोड बेअरिंग’च्या माध्यमातून ’विद्यापीठ गेट’ची निर्मिती केली. ६ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर १९७१ दरम्यान गेटची निर्मिती करण्यात आली. अजिंठा लेणीतील ’चैत्य गवाक्षाची प्रतिकृती’ म्हणाजे सदर गेट आहे. निर्मितीपासून या गेटला एक ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. मराठवाडा विकास आंदोलन नामांतर चळवळ यासह अनेक महत्वाच्या घटना घडामोडींचे गेट साक्षीदार ठरले. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १४ जानेवारी १९९४ रोजी ’डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार केला. त्यावेळी कुलगुरु डॉ.विठ्ठलराव घुगे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा उपस्थितीत नामविस्तारसह फलक लावण्यात आला. तेव्हापासून गेली ३० वर्षे विद्यापीठ गेटला १४ जानेवारी हजारो लोक येतात. याच ठिकाणी सभा, मेळावे व शेकडो पुस्तक विक्रेत्यांची दुकाने देखील थाटली जातात. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चैत्यभूमी (मुंबई), दीक्षाभुमी (नागपूर) या प्रमाणेचे विद्यापीठ गेटचेही ऐतिहासिक महत्व आहे. शहरातील अनेक वार्डात विद्यापीठ गेटच्या प्रतिकृती असून अनेकांच्या घरावर, कार्यालयावरही विद्यापीठ गेटची छबी झळकत असते. अशा विद्यापीठ गेटचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी घेतला. गेटमधून वाहनांची वर्दळ असल्याने नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. गेटच्या दोन्ही बाजूंनी सुशोभिकरण तसेच फुलांची रोपे लावण्यात आली आहेत. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भित्तीचित्रे म्युरल लावण्यात आली आहेत. या सुशोभिकरण्याची संपुर्ण तयारी विद्यापीठ प्रशासनाने केली आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.


विद्यापीठ गेट अजरामर राहील : मा.कुलगुरु

ऐतिहासिक महत्व असलेल्या विद्यापीठ गेटचे  जतन करण्यासाठी सुशोभिकरण करण्यात आले आहे. गेट मधून होणारी वाहतुक बंद करुन दोन्ही बाजुने वाहतुकींची सोय करण्यात आली. गेटचे सुशोभीकरण करण्यात आले असून नामांतर शहीद स्मराकाचे कामही सुरु करण्यात असून नामांतर शहीद स्मराकाचे कामही सुरु करण्यात आले आहे. ’विद्यापीठ गेटचे पावित्र्य लक्षात घेऊन ते जतन करुन’ अजरामर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Pages