किनवट तालुक्यातील पाच महसूली मंडलात अतिवृष्टी जुलै महिन्यातील तालुक्यातील ही पाचवी अतिवृष्टी : शेकडो हेक्टरवरील पिके भूईसपाट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 28 July 2023

किनवट तालुक्यातील पाच महसूली मंडलात अतिवृष्टी जुलै महिन्यातील तालुक्यातील ही पाचवी अतिवृष्टी : शेकडो हेक्टरवरील पिके भूईसपाट

किनवट,ता.२८(बातमीदार) : तालुक्यात पावसाचा जोर सुरूच असून, मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. पावसाच्या कहरामुळे तालुक्यातील पाच मंडलात पाचव्या अतिवृष्टीची नोंद झाली असून, या पाचही अतिवृष्टी याच जुलै महिन्यात झालेल्या आहेत. उर्वरीत चार मंडलात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे. गुरूवारी सकाळी संपलेल्या गत २४ तासात तालुक्यातील नऊ महसूल मंडलात बरसलेला एकूण पाऊस ७०४.८ मि.मी. असून, त्याची सरासरी ७८.३१ मिलिमीटर आहे.


       तालुक्यातील खरीपाच्या पेरण्या अगदी काल-परवा शंभर टक्के पूर्ण झाल्या आहेत. जुलैमध्ये नऊही मंडळात झालेल्या या अतिवृष्टी कोवळ्या पिकांच्या जीवावरच बेतलेल्या आहेत. पैनगंगेसह नदी,नाले व ओढ्यांकाठची शेकडो हेक्टर शेतजमीनी पुरामुळे खरडल्या गेल्या आहेत. नुकतीच उगवलेली पिके अक्षरश: वाहून गेली आहेत. काही जागच्या जागी कुजून नष्ट झालेली आहेत. दरवर्षीच्या या शेतीच्या नुकसानीपायी शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झालेला आहे. नुकसानीच्या तणावामुळे मानसीकदृष्ट्या खचलेला दिसतो.


       याच जुलै महिन्यात झालेल्या पाच अतिवृष्टीमध्ये  तालुक्यातील नऊ महसूल मंडलापैकी इस्लापूर मंडलात सर्वाच जास्त वेळा अर्थात चारदा अतिवृष्टी झाली आहे.बोधडी, जलधारा, शिवणी व दहेली मंडलात तीन वेळा, उमरी बाजार व किनवट मंडलात दोनदा तर मांडवी व सिंदगीमोहपूर मंडळात प्रत्येकी एक वेळा अतिवृष्टी झालेली आहे.


    गुरूवारी सकाळी संपलेल्या गत २४ तासात किनवट तालुक्यातील पावसाची नोंद पुढील प्रमाणे असून,  कंसात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या मंडळनिहाय एकूण पावसाची नोंद दिलेली आहे.  किनवट- ७१.३ (७२५.१ मि.मी.); बोधडी- १२९.८(७१७.० मि.मी.); इस्लापूर- १३५.३ (८२३.८ मि.मी.); जलधरा- १३५.३ (६७७.० मि.मी.); शिवणी- १३५.३(७२२.७ मि.मी.); मांडवी- २७.०(५१७.६ मि.मी.);  दहेली- १५.५ (६८३.३ मि.मी.), सिंदगी मो. ३१.८ (७८५.५ मि.मी.); उमरी बाजार २३.५ (५९२.० मि.मी.).


      तालुक्यात एक जूनपासून नऊ मंडळात मिळून आजपर्यंतचा पडलेला एकूण पाऊस ६,२४४ मि.मी.असून, त्याची सरासरी ६९३.७८ मि.मी.येते.  आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक पाऊस इस्लापूर मंडळात झाला असून, सर्वात कमी मांडवी मंडळात झालेला आहे. तालुक्यात शुक्रवार पर्यंत पडणारा अपेक्षित सरासरी पाऊस  ४४८.३० मि.मी.असून, त्या तुलनेत १५४.७४ टक्के पाऊस पडलेला आहे. याचा अर्थ सरासरीपेक्षा ५४.७४ टक्के जास्त पाऊस पडलेला आहे. १ जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान तालुक्यात पडणारा वार्षिक पाऊस १,०२६.५८ मि.मी.असून, या तुलनेत आतापर्यंत तालुक्यात ६७.५८ टक्के पाऊस पडलेला आहे.


     तालुक्यातील जी काही पिके वाचली आहेत, त्यात सततच्या पावसाने प्रचंड तण वाढले असून, आंतरमशागतीची कामे खोळंबली आहेत. पावसामुळे किटकनाशकांची फवारणी न झाल्यामुळे पिकांवर रोगांचा व पाने कुरतडणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव झालेला असून, पिकांची वाढ खुंटून पाने पिवळी पडलेली दिसत आहेत.

      झालेल्या अतिवृष्टीमुळे मांडवा मार्गावरील उपवासी  नावाच्या नाल्याला आलेल्या जोरदार पुरात बेल्लोरी प्रभागातील अशोक दोनीवार नावाचा एक शेतमजूर वाहून गेला असून, त्याचा शोध सुरू आहे. तसेच कोठारी ते मदनापूरला जोडणाऱ्या नवीन झालेल्या पुलाच्या सुमारे ६ ते ७ फुटावरून पुराचे पाणी वाहिल्यामुळे व सोबतच एक मोठे झाड पुलाच्या शेवटी उन्मळून पडल्यामुळे पाणी अडून पुलाच्या  दोन्ही बाजूला शेवटी टाकलेला कच्चा मुरूमाचा भराव वाहून गेला. त्यामुळे काल सकाळ पासून वाहतूक खोळंबली होती. आ.केराम यांच्या सूचनेनुसार भाजपाचे बाबूराव केंद्रे व सहकाऱ्यांनी तातडीने तो मार्ग दुरूस्त करून घेतल्यामुळे त्या पुलावरून सध्या  वाहनाची ये-जा सुरू झालेली आहे, अशी माहिती केंद्रे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Pages