किनवट,दि.16( प्रतिनिधी) : तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या बोधडी येथील विद्यार्थ्यांची एसटी अभावी होणारी शिक्षणाची गैरसोय लक्षात आल्यानंतर, शिवसेनेचे (उबाठा) तालुकाप्रमुख मारोती दिवसे पाटील यांनी एसटी आगार प्रमुखांना बोधडी –किनवट बस तत्काळ सुरू करण्याबाबत निवेदन दिल्यानंतर, त्याची दखल घेऊन आज शनिवारपासून विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करण्यात आली आहे.
बोधडी परिसरामध्ये इयत्ता पाचवी ते पदवीपर्यंतचे सुमारे 500 विद्यार्थी किनवट येथील विविध शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतात. मात्र, शालेय वेळापत्रकांप्रमाणे बोधडीवरून किनवटला जाण्यासाठी एकही बस नसल्यामुळे, ऑटो, जीप, ट्रक आदी अवजड वाहनाद्वारे त्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत असून, गरीब विद्यार्थ्यांना हे परवडणारे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही बाब शिवेसेना तालुका प्रमुख दिवसेपाटलांच्या कानावर घातली. त्यांची ही कुचंबणा लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ याविषयी बस आगारप्रमुखांना निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात आणून देऊन, बोधडी ते किनवट सकाळी सात वाजता व किनवट ते बोधडी सकाळी अकरा व सायंकाळी 5 किंवा 6 दरम्यान शाळा, कॉलेजच्या वेळेनुसार ये-जा करण्यासाठी बस सोडण्याची विनंती केली. त्याची दखल घेऊन आगार प्रमुख एच.एम.ठाकूर यांनी तत्परतेने शनिवार (दि.15) पासून विद्यार्थ्यांसाठी बस सुरू केल्यात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. तत्काळ प्रतिसाद दिल्याबद्दल आगारप्रमुखांचे दिवसेपाटलांनी आभार व्यक्त केले. यावेळी शिवसेना (उबाठा) युवासेना प्रमुख अतुल दर्शनवाड, शहरप्रमुख बाबू जाटवे, यु.से.शहरप्रमुख प्रमोद जाधव व शेख आसिफ, सर्कल प्रमुख साईनाथ रुद्रावार, नागेश मंत्रीवार, संतोष गीते, विवेक वाघमारे, ता.सं.युवासेना शिवम् देवकते यांचेसह बरेच शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment