सुरेशदादा गायकवाड कार्यकर्ते निर्माण करणारे विद्यापीठ - अॅड.मिलिंद सर्पे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 31 July 2023

सुरेशदादा गायकवाड कार्यकर्ते निर्माण करणारे विद्यापीठ - अॅड.मिलिंद सर्पे

    माझ्या सार्वजनिक जीवनावर सुरेश गायकवाड ,प्रा. पी. एस.धनवे,एस. एम. प्रधान , दादाराव कयापाक व डॉ. अशोक गायकवाड या पाच जणांचा अत्यंत प्रभाव पडला आहे ,नव्हे या लोकांमुळेच मी बालपणातच सामाजिक चळवळीत ओढल्या गेलो.या पैकी सुरेश दादा गायकवाड यांचं नाव मला अग्रक्रमाने घ्यावेच लागेल .


        सुरेश गायकवाड हे नाव जेंव्हा मला माहित झालं तेंव्हा माझं वय फारतर बारा वर्षे असेल. तेंव्हा मी सहाव्या वर्गात शिकत होतो. माझ्या घराशेजारी असलेल्या रामराव कावळे यांच्या खोली मध्ये पी.जी.गायकवाड साहेब रहायला आले .त्यांचा छोटा भाऊ म्हणजेच सुरेश गायकवाड पी. जी. गायकवाड हे पोस्ट ऑफिस मध्ये कर्मचारी होते. सुरेश गायकवाड हे नांदेड ला 10 वि ची परीक्षा देऊन किनवट ला भावाकडे राहू लागले .तो काळ 75 चा असावा .या काळात रिपब्लिकन पक्ष हा गटातटात विभागलेला होता .  


                      राज्यात दलितांवर अन्याय-अत्याचार मोठया प्रमाणावर होत होता. या संदर्भात सुरेश गायकवाड यांच्याकडून सविस्तर माहिती मिळू लागली.  सुरेश गायकवाडांचा आमच्या नगरातील पहिला मित्र म्हणजे नितीन कावळे सोबत मीही सुरेश गायकवाड बरोबर बराच वेळ राहू लागलो होतो.सुरेश गायकवाड नितीन कावळे व मी  एकदा कोठारीला नितीन  कावळे च्या शेतात जांभुळ खाण्यासाठी गेलो होतो .ती आठवण मी आजही विसरू शकलो नाही.


तत्कालीन दलित समाजाच्या परिस्थितीवर सुरेश गायकवाड हे अत्यंत प्रभावीपणे आपली मते व्यक्त करीत .दलित समाजाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे.अश्या परिस्थितीत दलित समाजावरील तरुणांनी स्वस्त बसून चालणार नाही ,त्याने समाजासाठी कांहितरी केलंच पाहिजे.अशी त्यांची कळकळ असे .मी वयाने लहान असूनही त्या काळात सुरेश गायकवाड यांच्या सहवासात राहू लागलो .त्यांच्यामुळे मला गौतम बुद्ध, महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख झाली.


       एका बैठकीत एक प्रसंग मी आजही विसरू शकलो नाही.ते मला म्हणाले की,"तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी नोकरीचा विचार न करता चळवळीला वाहुन घेतले पाहिजे". मी ते विचार माझ्या काळजात कोरून ठेवले .पुढे चालून प्रथम श्रेणीत दोन पदव्या प्राप्त करूनही नौकरीसाठी साधा अर्जही कुठे पाठविलेला नाही.माझ्या परीने आजही मी कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे.


      मी चळवळीत योगायोगाने आलेलो नाही.तर जाणून बुजून ठरवून आलो आहे आणि ह्या मागची प्रेरणा होती ती  मात्र सुरेश गायकवाड यांची .त्यांच्यासोबत मी विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनात सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत  सहभागी होतो.विद्यापिठ नामांतर   चळवळीच्या   काळात 15-15 दिवसाच्या जेल मी सहावेळा भोगला.आज मी त्यांच्या सोबतही नाही,त्यांच्या पक्षातही नाही ,तरी मी त्यांना माझा राजकीय गुरू आजही मानतो.


         सुरेश गायकवाड यांच्या सोबत प्रारंभीच्या काळात दलित पँथर मध्ये काम करतांना एक बिन्नीचा कार्यकर्ता म्हणून मी तयार झालो.त्यांनी माझ्यावर "शिशु दलित पँथर" च्या अध्यक्ष पदाची जबाबदारी  सोपवली होती.


तन -मन-  धनाने काम कसे करायचे, देहभान विसरून ,भूक - तहान विसरून कसे कामं करायचे, हे आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो.त्यांच्या सोबत वीस- वीस किलोमीटर रात्र आहे की दिवस आहे ,हे न पाहता पायी फिरण्याचा अनुभव घेतला.याच दरम्यान माझा वैचारिक पायाही त्यांच्यामुळेच मजबूत होत गेला.    


                     पहिल्यांदा मी 1977 ला दलित पँथर च्या मोर्च्यासाठी सुरेशदादा गायकवाड सोबत मुंबईला गेलो,तेव्हा मी हाफ चड्डीवर होतो.वय होत चौदा वर्ष. मुंबईत मोर्च्यावर लाठीमार झाला.माझी व किनवट च्या पँथरची फाटाफूट झाली,तेंव्हा माझे काय होईल ? या काळजीने सबंध रात्रभर ते बेचैन झाले होते.एका पोलीस स्टेशन मधून अर्ध्यारात्रीनंतर  माझी माहिती कळाल्यावर व माझी प्रत्यक्षात मनमाड रेल्वे स्टेशन भेट झाल्यावर वर त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. कार्यकर्त्यांची जीवापाड काळजी घेणारे हे त्यांचे रूप अजुनही मी विसरु शकत नाही.  


        "दलित पँथर",च्या बैठकिसाठी  आम्ही दुपारच्या रेल्वेने बोधडी(बु.)येथे।  गेलो होतो.आम्ही जवळपास २५ ते ३० पॅंथर होतो.ही घटना जुलै १९७७ ची असावी.त्यावेळी तालुका दलित पँथर चे अध्यक्ष दादाराव कयापाक व सरचिटणीस सुरेश गायकवाड हे होते‌.या दोन पॅंथर च्या नेत‌त्वाखाली आम्ही संपूर्ण तालुक्यात फिरत होतो.दिवसभर पॅंथर कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी झाल्या.सायंकाळी आठ-साडे आठच्या सुमारास बैठक झाली.बैठक तासभर चालली.त्या नंतर पिटल भाकरीचे जेवन झाले.यात रात्रीचे ११ वाजले.आता झोपायचे कुठे असा प्रश्न  निर्माण झाला.त्याकाळी आपल्या कार्यकर्त्यांची  झोपडीवजा छोटी घरे.आजच्या काळातील समाज मंदिरात सारखी किंवा विहारासारखी सार्वजनिक ठिकाणही त्या काळी नव्हती.अशा परिस्थितीत आम्ही किनवटला पायी जाण्याचे ठरवून रेल्वे पटरीने निघालो देखिल.बोधडी ते किनवटचे आंतर होते.२० किलोमीटर.हे आंतर रात्रभर  कापून आम्ही सकाळी-सकाळी किनवटला पोंहचलो.परंतु,या रात्रीच्या अंधारात आमच्यावर एक विचित्र बाका प्रसंग ओढावला होता.एका मोठ्या अपघातातून आम्ही सहीसलामत बचावलो होतो आणि विसरता न येणा-या त्या रात्रीचा प्रसंग माझ्या समोर क्रमाक्रमाने सरकु लागला.

     "दलित पँथर", ची स्थापना किनवट मध्ये १९७५ मध्ये प्रा‌.पी.एस.धन्वे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.तत्कालीन बौद्ध वाडा व नंतर सिद्धार्थ नगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नियोजित बुद्ध विहाराच्या जागेत पॅंथर ची पहीली बैठक झाली होती.तेंव्हा दादाराव कयापाक, सुरेश गायकवाड,रामराव भरणे,माधव कावळे,यादव नगारे, रघुनाथ कावळे,प्रकाश नगराळे,डी.टी.कदम,मनोहर भरणे व मी स्वत:बैठकीला उपस्थित होतो.पुढे चालून दादाराव कयापाक व सुरेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात पॅंथरची तुफान चळवळ सुरु झाली.१९७६-७७ मध्ये सुरेश गायकवाड यांनी किनवटच्या बळीराम पाटील महाविद्यालयात ११वी ला प्रवेश घेतला.आपल्या नेतृत्वगुनांमुळे ते बिनविरोध विद्यार्थी संसदेचे सचिव म्हणून निवडून आले.पुढच्या वर्षि(१९७७-७८) मध्ये ते विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली.सुरेश गायकवाड सोबत महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी हे पॅंथरमध्ये सक्रीय कार्य करत होते.ससाने नावाच्या कार्यकर्त्याचे नाव आजही माझ्या लक्षात आहे. 

   विद्यार्थी संसदेची निवडणूक झाल्यानंतर कांहीं दिवसांननीच आम्ही बैठकीसाठी बोधडीला आलो होतो.माझ्या आठवणी प्रमाणे बहुतेक तो जुलै चा महिना असावा.

   बैठक आटोपून व जेवन करून आम्हि किनवटला येण्यासाठी रेल्वे पटरीने पायी निघालो होतो.किनवट ते बोधडी दरम्यान मदनापूरच्या पुढे "काळे पाणी "म्हणून एक नाला आहे.भूता -खेताच्या अनेक कथा या नाल्याला जोडल्या जात होत्या.आम्ही रेल्वे पटरीने गप्पा गोष्टी करत चालत येत असतांना त्या काळे पाणी नाल्याच्या जवळ रेलवे पटरीवर आम्हाला एक सूर्या सारखा लाल गोळा पटरीवर असलेला दिसला.हे द‌ष्य दिसताच आम्ही सर्वजन घाबरलो.पुढे जायाचे की नाही याचा विचार सुरु झाला.परंतु,संख्येने आम्ही २५-३०पॅंथर असल्याने पुढे जाण्याचे ठरविले.आम्ही जसे - जसे पुढे जाऊ लागलो तसा- तसा तो गोळा छोटा होत असल्याचे आम्हाला दिसू लागले.त्या लाल गोळ्या जवळ आल्यावर आम्हाला दिसले की रेल्वे पटरीवर लाल कंदिला सारखा दिवा लावून ठेवण्यात आला होता. सकाळी आम्ही किनवटला आल्यावर आपल्या एका रेल्वे कर्मचाऱ्यांकडून कळाले की,त्या ठिकाणी माल गाडिचे डब्बे रेल्व पटरीवरुन घसरले होते.यामुळे मागून या मार्गावरुन येणाऱ्या रेल्वे ला कळावे म्हणून त्या ठिकाणी लाल दिवा लावण्यात आला होता.तसेच दोन पटरीच्या सांधिमध्ये बारुद लावण्यात आले होते ‌.विशेष म्हणजे त्या कर्मचा-याने सांगीतले होते की,तुमच्या पैकी एखाद्याचाही पाय त्या बारुदवर पडला असता तर मोठा अपघात झाला असता.

    या प्रसंगामुळे आजही ती न विसरता येणारी रात्र आठवते व तेवढ्याच ताकदीने व निर्धाराने फुले - आंबेडकरी चळवळीत काम करण्याचि उर्जा मिळत रहाते.


तसा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे.परंतु, आज जो काही आहे तो सुरेशदादा गायकवाड यांच्या मुळेच आहे.कार्यकर्ते निर्माण करण्याचे विद्यापीठ म्हणुन सुरेशदादा गायकवाड यांचे नाव घ्यावे लागेल. किनवट च्या पॅंथर चळवळीचे मंतरलेले ते दिवस आजही कार्यकर्ते  विसरणार नाहीत.किनवटची आंबेडकरी चळवळ सुरेश गायकवाड यांच्या नावाशिवाय पुढे जाऊच शकत नाही.त्यांच्या 63 व्या वाढदिवसा निमित्य त्यांना दिर्घ आयुष्य चिंतीतो !


       ✍️  अॅड.मिलिंद सर्पे,किनवट

No comments:

Post a Comment

Pages