मनोज जरांगे करणार महाराष्ट्राचा दौरा; उद्या सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा घेणार भेट, मराठा आरक्षणाच्या डेडलाईनबाबत चर्चा करणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 5 November 2023

मनोज जरांगे करणार महाराष्ट्राचा दौरा; उद्या सरकारचे शिष्टमंडळ पुन्हा घेणार भेट, मराठा आरक्षणाच्या डेडलाईनबाबत चर्चा करणार


संभाजीनगर :

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील हे पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. उद्या किंवा परवा ते याबाबतची घोषणा करणार आहे. तसेच, सरकारचे शिष्टमंडळ उद्या सोमवारी मनोज जरांगेंची पुन्हा रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहे. मराठा आरक्षणाची डेडलाईन कोणती याबाबत शिष्टमंडळ चर्चा करणार असल्याची माहिती मनोज जरांगेंनी दिली आहे. त्यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला.


आता चांगले दिवस


मनोज जरांगेवर सध्या छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले, माझी तब्येत आता चांगली आहे. मी ठणठणीत आहे. कुणीही काळजी करु नये. मात्र, आता आरक्षण मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. आतापर्यंत मराठा समाजावर खूप अन्याय झाला आहे. आता चांगले दिवस आले आहे. आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ येत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरुच राहणार आहे.


1 डिसेंबरपासून साखळी उपोषण


पुढील आंदोलनाची दिशा काय असणार याबाबत माहिती देताना मनोज जरांगे म्हणाले, मी पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. महाराष्ट्रातील दौरा कधीपासून सुरु होणार ते उद्या किंवा परवा जाहीर करणार आहे. या दौऱ्यात आतापर्यंत राहिलेल्या भागांत आपण जाणार असून मराठा समाज बांधवांची भेट घेणार आहे. त्यांना मराठा आरक्षणा मागची आपली भूमिका समजावून सांगणार आहे व पुढील लढाई अधिक जोमाने लढण्यासाठी त्यांना तयार करणार आहे. तसेच, मराठा आरक्षण व आंदोलनाची धग व ठेवण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात १ डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णयही जरांगेंनी जाहीर केला.


आत्महत्यांचे सत्र थांबेना


दरम्यान, आंदोलनादरम्यान राज्यात काही ठिकाणी जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या. मात्र, पुढील आंदोलनात असे काहीही होता कामा नये, असेही मनोज जरांगेंनी बजावले. दुसरीकडे, जरांगेंचे आंदोलन स्थगित झाले असले व सरकार मराठा आरक्षणासाठी युद्धपातळीवर काम करत असल्याचे दिसत असले तरी मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. यावर मनोज जरांगे म्हणाले, कुणीही आत्महत्या करु नका. २४ डिसेंबरपर्यंत आपणास खांद्याला खांदा लावून लढायचे आहे. न्यायाचा दिवस जवळ आला आहे. न्याय मिळवण्यासाठी सातत्य ठेवावे लागणार आहे. आतापर्यंत आमच्यावर खूप अन्याय झाला आहे. हक्काचे आरक्षण आम्हाला मिळाले नाही. आम्हाला शेती पाहायची आहे आणि मुलांसाठी काम करायचे आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. आपले आंदोलन शांततेचे आणि लोकशाही मार्गाचे आहे. उद्रेक होईल, असे काही करु नका.


डेडलाईनचा मुद्दा निकाली काढणार


मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारचे शिष्टमंडळ उद्या सोमवारी परत भेट घेणार आहे. त्यावेळी टाईमबॉन्डचा मुद्दा निकाली लावणार आहोत. मराठा आरक्षणासाठी राज्यात प्रथमच एकाच वेळी तीन समित्या काम करत आहे. मागावर्गीय आयोग, शिंदे समिती आणि न्यायमूर्तीची समिती काम करत आहे. यामुळे आता पूर्ण आरक्षण मिळण्याचा दिवस जवळ आला आहे.

No comments:

Post a Comment

Pages