किनवट,(प्रतिनिधी) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतामध्ये सलगरित्या बांधावर व पडीक जामिनीवर फळबाग व इतर वृक्ष लागवड करण्यासाठी शेतकर्यांना ०३ वर्षात १०० टक्के अनुदान आहे. या अनुषंगाने किनवट तालुक्यातील एकूण ८८ शेतकर्यांनी एकूण ६९.०५ हेक्टर जमिनीवर तब्बल ५८ हजार ६२७ विविध प्रकारच्या फळझाडांची लागवड करून त्याचा लाभ घेतला असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
शेतकर्यांनी पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड करून आर्थिक उन्नती साधावी या उद्देशाने शासनाकडून शंभर टक्के अनुदान देऊन प्रोत्साहित केले जात आहे. अल्प व अत्यल्पभूधारक (पाच एकरांच्या आतील) शेतकर्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (एमआरईजीएस) व पाच एकरांवरील शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर योजना राबवली जात आहे. बहुतांश शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लागवड करतात. राज्यात गेल्या तीन वर्षांत दरवर्षी प्रत्येकी ६० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट निश्चित केले होते. लागवडीला मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रत्येक वर्षी चाळीस हजार हेक्टरपेक्षा अधिक म्हणजे उद्दिष्टाच्या ८० ते ९० टक्क्यांपर्यंत फळबाग लागवड झालेली असल्याचे सूत्रांकडून कळते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड करताना एप्रिल, मे महिन्यातच नियोजन करून खड्डे खोदले जातात. पावसाला सुरुवात झाली की जून ते सप्टेंबर कालावधीत जास्तीत जास्त फळबाग लागवड केली जाते. यंदा मात्र सुरुवातीपासूनच पाऊस नाही. त्याचा लागवडीवर परिणाम झाल्याचे दिसून येत असून, नांदेड जिल्ह्यात यंदा उद्दिष्टाच्या केवळ ३३.८७ टक्के लागवड झालेली आहे.
यापैकी किनवट तालुक्यामध्ये फळबाग योजनेअंतर्गत ७५ हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी किनवट तालुक्यातील एकूण २१० शेतकर्यांच्या अर्जास संमती मिळून प्रशासकीय मंजूर प्राप्त झाली होती. त्यापैकी प्रत्यक्षात ८७ शेतकर्यांनी त्यांच्या ६८.०५ हेक्टर सलग जमिनीच्या क्षेत्रावर फळपिकांची लागवड करण्याच्या उद्देशाने ५८ हजार ६२७ खड्डे खोदून तितक्याच फळझाडांच्या रोपांची लागवड केली. यासोबत एका शेतकर्याने आपल्या एक हेक्टर शेताच्या बांधावर २० फळझाडांची रोपे लावली आहेत.
सलग क्षेत्रावर फळपिकनिहाय लागवड झालेल्या क्षेत्रामध्ये आंबा ५०.८० हेक्टर, सिताफळ ०२ हेक्टर, पेरू ०३ हेक्टर, कागदी लिंबू ०१ हेक्टर, केळी १०.२५ हेक्टर आणि मोसंबी ०१ हेक्टर आणि एका शेतकऱ्यांने एक हेक्टर बांधावरील फळझाडे मिळून एकूण ८८ शेतकर्यांनी आपल्या ६९.०५ हेक्टर जमिनीमध्ये तब्बल ५८ हजार ६२५ उपरोक्त फळझाडांची लागवड केलेली आहे.
आंब्याची कलमे ५ बाय ५ मीटर अंतरावर हेक्टरी ४०० झाडे लावण्यासाठी तीन वर्षामध्ये मजुरी व इतर सामुग्रीसाठी मिळून एकूण ०२ लाख ३३ हजार ९७३ रुपये अनुदान तीन वर्षामध्ये टप्प्याटप्याने प्राप्त होत असते. याच धर्तीवर विविध अंतर व कलमांच्या संख्येनुसार पेरूसाठी ०१ लाख ६५ हजार ०६४ रुपये, मोसंबी व कागदी लिंबूसाठी ०१ लाख ९३ हजार १२४ रुपये, सीताफळासाठी ०१ लाख ६९ हजार ४२९ रुपये अनुदान प्राप्त होते. केळी या फळपिकाचा यंदाच या योजनेत समावेश केला असल्यामुळे अजून त्यासंदर्भातील अनुदानाबाबत माहिती प्राप्त झालेली नाही.
"महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतामध्ये सलग लागवड, बांधावर लागवड, पडीक जामिनीवर लागवड, रोहयो अंतर्गत फळबाग व इतर वृक्ष लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना ३ वर्षात १०० टक्के अनुदान आहे. आहे. यावर्षी केळी या फळपिकाचाही या योजनेत समावेश केलेला आहे. शेतकर्यांसाठी ही योजना अतिशय उत्तम व लाभाची असल्यामुळे, येत्या वर्षात या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी.”
- बालाजी मुंडे. तालुका कृषी अधिकारी, किनवट.
No comments:
Post a Comment