किनवट,दि.25(प्रतिनिधी) : माहूर मार्गावरील एका शेतातील आखाड्याजवळ अवैधरित्या चालणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. त्यात नगदी 49 हजार रुपये व काही दुचाक्या व एक चारचाकी वाहन मिळून तब्बल 05 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि.23) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, आठ व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शहरापासून उत्तरेकडे नायरा पेट्रोलपंपाच्या जवळील डम्पिंग ग्राऊंडच्या लगतच्या एका शेतात चालणाऱ्या अवैध जुगार अड्ड्यावर मागे काही महिन्यांपूर्वी काही अज्ञात सशस्त्र लुटारूंनी दरोडा टाकून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्यामुळे अधूनमधून इथे जुगार चालत असतो हे पोलिसांना माहीत होते. शनिवारी प्राप्त माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी रामचंद्र मळघने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.दीपक बोरसे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास त्याच अड्ड्यावर धाड टाकली. त्यात लाईटच्या उजेडात काही लोक पैसे लाऊन झन्ना-मन्ना नावाचा पत्यांचा जुगार खेळतांना आढळले. त्यातील सहा व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून, दोन व्यक्ती अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी ठरले. या ठिकाणी जुगाराच्या साहित्यासह नगदी 49 हजार रुपये आणि काही दुचाक्या व एक चार चाकी वाहनांची अंदाजित किंमत 4 लाख 85 हजार रुपये मिळून सुमारे 05 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हेड कान्स्टेबल गजानन डुकरे यांच्या फिर्यादीवरून या सर्व आरोपींवर गुरन 283/2023 कलम 12(ए) मुंबई जुगार कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एपीआय विशाल वाठोरे करीत आहेत.
No comments:
Post a Comment