किनवट विधानसभा क्षेत्रातील 330 केंद्रावर होणार मतदान सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे - कावली मेघना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 22 March 2024

किनवट विधानसभा क्षेत्रातील 330 केंद्रावर होणार मतदान सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे - कावली मेघना

किनवट (प्रतिनिधी) : हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होणार असून, त्यासाठीची अधिसूचना 28 मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे.  15 हिंगोली लोकसभेसाठी  83 किनवट विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार 02 लाख 65 हजार 723 असून, माहूर तालुक्यातील 97 तर किनवट तालुक्यातील 233 बूथ मिळून एकूण 330   केंद्रावर मतदान होणार आहे. मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून, सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांनी केले.

         तहसील कार्यालयामध्ये मंगळवारी (दि.19) सकाळी 11.30 वाजता राजकीय पक्षाचे पदाधिकारी  व माध्यम प्रतिनिधींची संयुक्त  बैठक घेण्यात आली. या वेळी उपस्थितांना निवडणुकीच्या संदर्भात माहिती देतांना त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर तहसीलदार शारदा चौंडेकर (किनवट) व किशोर यादव (माहूर),पालिका मुख्याधिकारी मुंगाजी काकडे , नायब तहसीलदार विकास राठोड, शेख एन.ए., अनिता कोलगणे, गट विकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव, गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

        या बैठकीत भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आचारसंहितेच्या अंमलबजावणी पासून तर निवडणूक संपेपर्यंतच्या कार्यक्रमाबाबतची सविस्तर माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. यात हिंगोली लोकसभेसाठी अधिसूचना निर्गमन 28 मार्च, उमेदवारी अर्जासाठी अंतिम तारीख 04 एप्रिल 2024 तर  अर्जांची छाननी 05 एप्रिल, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 08 एप्रिल तर  मतदान 26 एप्रिल 2024 रोजी होणार असून, मतमोजणी 04 जून 2024 रोजी होणार असल्याचे सांगितले. याशिवाय विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या पोस्टल वोटिंग कशा पद्धतीने होईल, केंद्रांची माहिती, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बद्दल शंका समाधान आणि मतदान करताना मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांनी घ्यावयाची काळजी या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

       त्यातील विशेष बाब म्हणजे, किनवट विधानसभा क्षेत्रात नऊ संवेदनशील मतदानकेंद्रे असून, त्यात किनवट तालुक्यातील दुंड्रा एक, मांडवा येथील तीन, चिखली बु.येथील 2 तर माहूर तालुक्यातील पापलवाडी या केंद्राचा समावेश आहे. तसेच इंजेगाव, झळकवाडी,पांगरपहाड, आंदबोरी,पिंपरफोडी,सिंगारवाडी व  सुंगागुडा या गावात अजिबात नेटवर्क येत नसल्याची माहिती देण्यात आली. लोकसभा निवडणुकीसाठी किनवट येथे सर्व समित्या कार्यान्वित झाल्या असून, राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना यादरम्यान कोणतीही माहिती लागल्यास एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आलेली आहे.  या अंतर्गत उमेदवारांना वाहन परवाने, झेंडे, पताके, चित्ररथ, मोबाईल व्हॅन, चौक सभा, जाहीर सभा, रॅली,उमेदवारांचे तात्पुरते प्रचार कार्यालय, हेलीपॅडचे अक्षांश रेखांश, तसेच माध्यम प्रमाणीकरण व  सनियंत्रण कक्षाकडून एसएमएस, ऑडिओ आणि व्हिडिओ व इतर प्रचार साहित्याबाबत परवानगी मिळविण्यासाठी या ठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी सहायक  जिल्हाधिकाऱ्यांनी केले

           दरम्यान,  हिंगोली लोकसभा मतदारसंघांतर्गत किनवट विधानसभा येत असून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील पुरुष मतदार एक लाख 36 हजार 972 , महिला एक लाख 28 हजार 740 व इतर(तृतीयपंथी) 11 असे एकूण दोन लाख 65 हजार 723 मतदार असल्याचे सांगण्यात आले. यात पुरुष नवमतदार दोन हजार 192, महिला नवमतदार एक हजार 297 असे एकूण तीन हजार 489  मतदारांची प्रथमत: नवी नोंद झाली. तसेच एकूण मतदारात दिव्यांग मतदार 03 हजार 489 असून, 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेले मतदात्यांची संख्या  3 हजार 500 असल्याची माहिती मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे यांनी दिली.

            निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. यासाठी स्थिर पथक, भरारी पथक व व्हिडिओ चित्रीकरण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने 'सी-व्हिजील' ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता विषयक तक्रारींचा जलदगतीने निपटारा होणार आहे. आचार संहिता जाहीर झाल्यापासून 48 तासांच्या आत सर्व राजकीय प्रचार साहित्य, पोस्टर, बॅनर्स काढण्यासाठी सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांना निर्देश दिले आहेत. निवडणुका निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिस विभागामार्फत प्रतिबंधात्मक कारवाई, शस्त्रे जमा करणे आदी कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Pages