किनवट : आदिलाबाद व किनवट,माहूरच्या प्रवाशांसाठी सोयीची असलेली आदिलाबाद - नांदेड, नांदेड - आदिलाबाद ही इंटरसिटी एक्स्प्रेस गेल्या अडीच महिन्यांपासून उशिरा धावत असून,अधूनमधून ही गाडी रद्द होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
तिरुपती - आदिलाबाद ही कृष्णा एक्स्प्रेस दररोज आदिलाबाद - नांदेड व नांदेड - आदिलाबाद या मार्गावर चालविण्यात येते. ही रेल्वेगाडी तेलंगणाच्या आदिलाबादसह किनवट, माहूर ते भोकरपर्यंतच्या प्रवाशांसाठी सोयीची आहे. पूर्वी ही गाडी निर्धारीत वेळेत धावत होती. परंतु, गेल्या जवळपास अडीच महिन्यापासून या गाडीची वेळ निश्चित राहिली नाही. कधी 2 ते 4 तास विलंब तर कधी गाडीच रद्द होत असल्याने दवाखाने, शासकीय कामकाजासाठी जाणाऱ्या प्रवाशांसह व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे. इंटरसिटीव्यतिरिक्त आदिलाबाद - परळी ही सवारी गाडी आहे. या गाडीची वेळ पहाटे 4 ची आहे. त्यामुळे ही गाडी ग्रामीण भागांतील लोकांसाठी कुठल्याच कामाची नाही. स्थानिकच्या प्रवाशांनाही ही गाडी गाठण्यासाठी पहाटे तीन वाजताच उठावे लागते. नांदेड - मुंबई तपोवन ' एक्स्प्रेसचा आदिलाबादपर्यंत विस्तार व्हावा, यासाठी मध्यंतरी प्रयत्न झालेत. परंतु,अद्याप या गाडीच्या विस्ताराबाबत निर्णय झाला नाही. एकीकडे रेल्वेगाडी अनियमित असताना किनवट - नांदेडसाठी किनवट बस आगारातून केवळ एकच बसगाडी सोडण्यात येत आहे. अपुरे प्रवाशी, रस्त्याची दुरवस्था या सबबीखाली बंद करण्यात आलेल्या बसफेऱ्या अद्याप बंदच असल्याने प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे.
No comments:
Post a Comment