किनवट : शहरातील डॉ.आंबेडकर चौक ते मांडवा रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्यामुळे या मार्गावरून ये -जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह वाहनधारक,पादचारी वैतागले आहेत. हा प्रभाग पालिकेच्या कार्यक्षेत्रात आहे की, नाही असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केल्या जात आहे.
शहराच्या डॉ.आंबेडकर चौक ते मांडवा या वर्दळीच्या रस्त्याची गेल्या कित्येक दिवसांपासून दुरवस्था कायम आहे. डॉ.आंबेडकर चौकाजवळ रेल्वेगेट आहे. रेल्वेगाड्यांच्या आवागमनामुळे दिवसभरातून अनेकदा रेल्वेगट बंद होते. परिणामी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागतात. याच रस्त्यावर सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक ते माध्यमिक विद्यालय तसेच महाविद्यालय आहे. दररोज विविध इयत्तेत शिकणारी शेकडो मुले, मुली सायकल, पायी शाळेत ये- जा करतात. रेल्वेगेटमुळे खोळंबलेली वाहतूक व रस्त्यावरील खड्डे यामुळे विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. भर पावसात गल्लीबोळात डांबरीकरणाचे काम करणाऱ्या पालिकेचे या वर्दळीच्या रस्त्याकडे दुर्लक्ष का होत असावे? असा सरस्वती कॉलनीतील लोकांना पडला आहे. त्यामुळे एसव्हीएम परिसर किनवट पालिकेच्या कार्यक्षेत्रात आहे की, नाही असा सवाल संतप्त नागरिकांतून उपस्थित होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग की पांदण रस्ता ?
एकीकडे पालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था असताना डॉ.आंबेडकर चौक ते गोकुंदा रस्त्याची चाळणी पाहाता हा राष्ट्रीय महामार्ग की पांदण रस्ता असा प्रश्न उपस्थित होत आहे. डॉ.आंबेडकर चौक ते गोकुंदा हा रस्ता किती फुटाचा, या वादात गेल्या सहा वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग 161 ए चे काम रखडले आहे. या रस्त्यावर न्यायालय, तहसील, नगरपालिका, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय अशी महत्त्वाची शासकीय, निमशासकीय कार्यालये आहेत. दरवर्षीच पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे थातूरमातूर पद्धतीने बुजविण्यात येतात. मोठा पाऊस होताच पुन्हा रस्त्यावर खड्डे पडत असल्याने वाहनधारक वैतागले आहेत. गेल्या सहा वर्षांपासून काम रखडले असताना रस्त्याच्या पूर्णत्वाबाबत आजी -माजी लोकप्रतिनिधींची भूमिका मौनच असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
No comments:
Post a Comment