प्रथम मी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. अण्णाभाऊ साठे हे मराठी मनाला एक प्रभावी असे साहित्यिक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या कादंबऱ्या आजही जवळजवळ सर्व स्तरातील असंख्य वाचक खूप मोठ्या आवडीने वाचतात. त्यांची साहित्यिक कारकीर्द सर्वसमावेशक, मना मनात नैतिक मानवी मूल्ये रुजवणारी व क्रांतिकारी स्वरूपाची आहे.
त्यांच्या साहित्याला फार मोठे रंजनमूल्य लाभलेले आहे, त्यामुळेही त्यांचे साहित्य सर्वसामान्य लोकही मोठ्या प्रमाणात वाचतात.
अण्णाभाऊ साठे ही संपूर्ण मराठी माणसांची आणि देशाचीही बौद्धिक व सांस्कृतिक संपदा आहे. अण्णाभाऊंची साहित्य संपदा कोणत्याही माणसाला संकुचित कक्षेमध्ये अडकवून ठेवणारी नाही. जातीच्या डबक्यात डुबक्या मारायला लावणारी नाही. ती व्यापक, विशाल आणि सर्वसमावेशक बनायला लावणारी आहे.
‘फकिरा’ मध्ये अण्णाभाऊ साठे यांनी ज्यांना हीन दिन लाचार समजलं त्या मांग जातीमध्येही किती पराक्रमी पुरुष असतात आणि ते गावावरील निष्ठेपोटी किती मोठा त्याग करतात याचे जिवंत दर्शन घडवलेले आहे. माकडीचा माळ या कादंबरीतून अनेक भटक्या जमातींच्या जीवन संघर्षाचे चित्रण करतात. वारणेच्या खोऱ्यात ही सत्तू या ढाण्या वाघाने सरंजामशाहीतील अन्याय अत्याचार विरुद्ध दिलेल्या संघर्षाची थरारक कहाणी आहे.चंदन, वैजयंता, चित्रा, आवडी चिखलातील कमळ, अलगूज, अग्निदिव्य, मयुरा या त्यांच्या स्त्रीकेंद्री कादंबऱ्या आहेत.अशा त्यांच्या साऱ्या कादंबऱ्या केवळ विशिष्ट जात वर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाहीत. अण्णाभाऊंचे साहित्य उच्चनीचतावादी जातिव्यवस्थेला नाकारणारेच आहे. अण्णाभाऊंच्या एकूण लेखनामध्ये जातीय दृष्टिकोन नाही तर प्रामुख्याने वर्गीय दृष्टिकोन आहे. अण्णाभाऊंची शायरी आणि वगनाट्य वर्ग लढण्याची चित्रण करतात. शोषकांच्याविरुद्ध शोषितांनी दिलेला संघर्ष मांडतात.
थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे मांग या जात समूहात जन्मास आले. त्यांचे या जात समूहात जन्मास येणे हा अपघात होता. सारेच लोक कुठल्यातरी जात समूहात जन्माला येतात ते अपघातानेच स्वतःच्या कर्तृत्वाने नाही. त्यामुळे विशिष्ट जातीत माझा जन्म झाला याचा अहंकार मिरवण्यात काही अर्थ नसतो. कुणीही मी विशिष्ट जातीत जन्माला आलो याचा अहंकार मिरवत असेल, गर्व करत असेल तर तो त्याचा महामूर्खपणा असतो.
माणूस कुठे जन्मास आला यापेक्षा त्याची प्रवृत्ती काय आहे? त्याची गुणवत्ता काय आहे आणि त्याचे कर्तृत्व काय आहे, हे फार महत्त्वाचे असते. अण्णाभाऊ साठे मांग समूहात जन्माला आले. या समूहाला इथल्या विषमतावादी जातिव्यवस्थेने अस्पृश्यतेचे स्थान दिलेले होते. ज्या समूहाला शूद्र म्हणून त्याच्यावर ज्ञान बंदी लाभलेली होती, त्या समूहात जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे प्रतिभा संपन्न होते. अण्णाभाऊंनीच प्रथम सदाशिव पेठी संकुचित डबक्यामध्ये अडकलेल्या मराठी साहित्याला अनुभव विशाल बनवले. खेड्यापाड्यातील, वाडी तांड्यातील, पाला पालावरील माणसांचे जीवन आपल्या साहित्यामध्ये जिवंतपणे चित्रित केले आणि त्या माणसांना फार मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली.
जात हा भारतीय जनमानसाला जडलेला सार्वत्रिक रोग आहे. हा रोग भारतीय माणसाला सभोवतीच्या माणसांकडे केवळ ‘माणूस’ म्हणून बघू देत नाही. तो त्याला संकुचित बनवतो.जात रोग माणसाला माणसापासून तोडतो. हा रोग विविध मानवी समूहांचे उच्च नीच असे स्तरीकरण करतो.जात रोगाने कनिष्ठ व गलिच्छ व्यवसायांमध्ये गुंतवलेल्या माणसांना गुलाम बनवलेले आहे. त्यांचे प्रचंड मोठे शोषण केलेले आहे. उच्चनीचतावादी जातिव्यवस्थेच्या पाळूखाली भरडल्या गेलेल्या लोकांनी जातिव्यवस्था संपूर्णपणे नष्ट करण्याच्या दिशेने पाउले टाकण्याची गरज असते परंतु या दिशेने जातिव्यवस्थेच्या पाळूखाली भरडले गेलेले लोक तरी भक्कम पाऊले टाकतात का हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे.
अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वच मराठी माणसांनी साजरी करावयास हवी. निदान साहित्य क्षेत्रातल्या माणसांनी तर करायला हवीच. परंतु आपल्याकडे तसे होत नाही कारण आपले सामाजिक पर्यावरण हे जात विषाणूंनी दूषित बनवलेले आहे. अण्णाभाऊ ज्या जात समूहात जन्मास आले त्या समूहातील काही लोक अण्णाभाऊंची जयंती अधिक उत्साहाने साजरी करतात. आपल्या सामाजिक पर्यावरणाचा भाग म्हणून असे होणे साहजिक आहे.
यावर्षीच्या जयंती निमित्ताने समाज माध्यमावर एक गाणे वेगवेगळ्या स्वरूपात समोर येताना दिसते. त्याचा विचार करणे आवश्यक आहे. त्या गाण्याचे कडवे खालील प्रमाणे आहे.
“आधी आधी जुन्या काळामधी
मांग म्हटलं की वाटायचं वाईट
आता मंग मंजी कॉलर टाईट”
या गाण्यातून प्रकट होणारा आशय अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना पूरक आहे की मारक आहे? या प्रश्नाचे उत्तर स्पष्टपणे हेच द्यावे लागते की या गाण्याच्या कडव्यामधून प्रकट होणारा आशय अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून प्रकट होणाऱ्या विचारांच्या विरोधात जाणारा आहे. असली गाणी उथळ माथ्याचे लोक लिहितात आणि गातात. आपले विशिष्ट ठिकाणच्या जन्मामुळे मिळालेले ‘मांग’पण मिरवण्यात पराक्रम तो काय? आपले ‘मांग’पण महत्त्वाचे की ‘माणूस’पण महत्त्वाचे?
कारण ती विशिष्ट जात मिळवण्यासाठी त्याचा समूहात जन्माला आलेल्या माणसाने कोणताही व्यक्तिगत पराक्रम केलेला नसतो. ती अपघाताने मिळालेली असते. जी गोष्ट कुठलेही कष्ट न करता अपघाताने मिळालेली आहे तिचा अभिमान आणि गर्व करणे हा मूर्खपणा असतो. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने मांग जातीचा गर्व करणे हा मूर्खपणाच असतो.
जात ही अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीची संस्था आहे. वर्ग बदलता येतो परंतु जात मात्र बदलता येत नाही. कारण जात या घटकाच्या भोवती अनेकविध कुंपणे निर्माण केलेली आहेत. त्यातील मुख्य कुंपण ‘बेटी बंदी’ हे आहे. जात टिकून आहे ती बेटी बंदीच्या चालीमुळेच. इथल्या सर्वच पूर्वास्पृश्य जात समूहातील लोकांनी दैन्य दारिद्र्य आणि हीनदीनता प्रदान करणाऱ्या जातीचा अभिमान बाळगण्यात काहीही अर्थ नसतो. या समूहातील सर्व लोकांनी जातिव्यवस्था नष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यायचा असतो. मंग, महार, चांभार, ढोर, होलार, डकलवार इत्यादी महाराष्ट्रातील पूर्वास्पृश्य जाती आहेत. या जात समूहातील लोकांना वरच्या जात समूहातील लोकांनी हीनदीनतेची, तुच्छतेची अपमानास्पद अशी वागणूक दिलेली आहे. या जातिव्यवस्थेने या समूहांना अत्यंत हलक्या आणि गलिच्छ अशा कामांमध्ये पिढानुपिढ्या अडकवून ठेवलेले आहे. या समूहांवर हिंदूंच्या जातिव्यवस्थेने ज्ञानबंदी,शस्त्रबंदी आणि व्यवसाय बंदी लादलेली होती. या समूहांचे मानवी हक्क हिरावलेले होते. त्यामुळेच हे लोक हीन, दीन, दुबळे आणि लाचार झाले.
मला समाज माध्यमावर असे एक दृश्य दिसले की, एका तरुणाने गळ्यामध्ये, हातामध्ये सोन्याच्या मोठमोठ्या साखळ्या घातल्या आहेत आणि तो ‘मांग म्हटलं की कॉलर टाइट’ हे गाणं म्हणतो आहे.मांग म्हटलं की आता कॉलर कशी काय टाइट होते? काय फरक पडलाय? तुझ्या एकट्याचं दारिद्र्य गेलं.तू जरा बऱ्या स्थितीत आलास म्हणून सारे मांग संपूर्णपणे सुधारले असं म्हणता येईल काय? असल्या लोकांनी हा उथळपणा सोडून दिला पाहिजे. समाजातील प्रत्यक्ष वास्तवाची जाणीव ठेवली पाहिजे. मातंग समाज आजही घोर अज्ञानात आहे. अंधश्रद्धा व दारिद्र्यामध्ये आहे. खेड्यापाड्यात राहणाऱ्या बांधवांना आजही कुठलीही प्रतिष्ठा नाही. मंदिरामध्ये प्रवेश केला म्हणून झोडपून काढल्याच्या बातम्या आजही अनेकदा येतात. महार बांधवांनी स्वतःला महार म्हणवून घेणे बंद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्वाभिमानी आदर्श स्वीकारून कल्याणकारी अशा बुद्ध दिशेने वाटचाल सुरू केली. इथल्या व्यवस्थेने महारांना अस्पृश्य व गुलाम बनवले होते, तसेच मंग,चांभार, होलार यांनाही अस्पृश्य व गुलाम बनवलेले होते. जातीची ही ओळख सन्माननीय नाही. गर्व करावा अशी नाही. जात जोपासण्याची गोष्ट नाही तर ती नष्ट करण्याची गोष्ट आहे, हे पूर्वास्पृश्य समूहात जन्मलेल्या माणसांनी गंभीरपणे लक्षात घेतले पाहिजे. जातीग्रस्त धर्म व्यवस्थेला छेद देऊन सकलजन कल्याणकारी, बुद्धिवादी, विज्ञानवादी, समतावादी अशा बुद्ध दिशेने वाटचाल केली पाहिजे.
अण्णाभाऊंनी ‘फकीरा’ ही आपली अत्यंत महत्त्वाची कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली.‘वारणेच्या खोऱ्यात’ ही कादंबरी मॅक्झिम गॉर्की या थोर साहित्यिकाला अर्पण केली.’जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव’अण्णाभाऊंच्या या वचनातील जातिव्यवस्थेवर घाव घालण्याचा संदेशही समजून घेतला पाहिजे.
आज जातिव्यवस्था टिकून आहे ती केवळ उच्च वर्णीयांच्यामुळे असे म्हणता येत नाही. जातिव्यवस्था कायम राहण्यात उच्च जात वर्णीयांचे नक्कीच हित आहे. परंतु जात व्यवस्था टिकून राहण्यात पूर्वास्पृश्य लोकांचे कुठलेही हित नाही. तरीही दैन्य दारिद्र्य देणाऱ्या आणि सर्व अर्थाने मागासलेले ठेवणाऱ्या जातीला पूर्वास्पृश्य, ओबीसी आणि सर्वच बहुजन लोक चिकटून असतात. म्हणून जातिव्यवस्था टिकून आहे. जातिव्यवस्थेचा अंत करण्यातच सर्व भारतीयांचे हित सामावलेले आहे, ही गोष्ट सर्वांना जेव्हा कळेल आणि कळल्यानंतर वळेल तेव्हा भारतीय लोक जातिव्यवस्था टिकवून ठेवणारी बेटी बंदीची चाल सार्वत्रिकपणे उठवतील. सर्वांच्यामध्ये सोयर संबंध निर्माण करतील आणि सर्व भारतीय एकजीव होतील.
अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामधून परस्पर प्रेम, नैतिकता, शीलसंपन्नता, स्वाभिमान यासारख्या मूल्यांचा आविष्कार होतो. अण्णाभाऊंचे साहित्य प्रत्येक माणसाला संकुचिततेमधून बाहेर काढते. व्यापक, सर्वसमावेशक व समृद्ध बनवते. जातीच्या कुंपणामध्ये बंदिस्त होण्यास सांगत नाही, याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे.
No comments:
Post a Comment