किनवट ( अनिल भंडारे ) :
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ (नोंदणीकृत) महाराष्ट्र राज्य, मराठवाडा विभागाच्या वतीने राज्यस्तरीय 'कविता शेती मातीच्या ' शिर्षक असलेले आभासी कवीसंमेलन नुकतंच संपन्न झाले. कवी संमेलनाचे अध्यक्षा हर्षल साबळे ह्या होत्या. कार्यक्रमाचे उदघाटन मंडळाचे राज्याध्यक्ष नटराज मोरे यांनी केले तर मराठवाडा विभाग अध्यक्ष रमेश मुनेश्वर यांनी प्रास्ताविक केले. एकापेक्षा एक कवितेच्या सादरीकरणाने संमेलनात रंगत आली.
कवयित्री अर्चना गरुड ह्यानी शेतकऱ्यांच्या जीवनावरील आशावादी कविता सादर करून वाहवा मिळवली..
" दिस येईल बळीचे, रान शिवार फुलेलं
पीक भरून सार, मन आनंदी डूलेलं "
डॉ. भोजराज लांजेवार यांनी पर्यावरणी संबंधी सुंदर रचना सादर केली..
" पावसाळ्यात करू संकल्प,
झाडे लावू अनेक
प्रदूषणाला आळा घालू,
विचार करू नेक "
हदयाक्षर मिलिंद कंधारे यांनी वास्तव परिस्थितीवर भाष्य करणारी रचना सादर केली..
"थरथरती ही काळी आई,
वनवन उडती पाखरं
पाण्याच्या रं थेंबापायी
व्याकुळ फिरते लेकरं.. "
प्राची परचुरे वैद्य या कवयित्रीने शेतकऱ्यांचे दुःख विशद करणारी कविता सादर केली..
" इमान राखून मातीचे,
नित्य राबतो मातीत
बळीराजाच जीवन, आयुष्यभर कष्टात "
प्रा. विजय पाटील यांनी पाणी- शिवार वर रचना सादर करून दाद मिळविली..
" पहिल्याच पावसाने मातीत गंध आला
कस्तुरीच्या सुगंधी शिवार पार झाला.. "
कवी राजेंद्र चारोडे यांनी कस्टकर्याचे जीवन वर्णन करणारी रचना सादर केली..
" कशी पडली वरुणा तुला आजही भ्रांत
दिसत कसा नाही रे तुला बळीचा हा आकांत "
कवचित्री वंदना तामगाडगे ह्यांनी सुंदर रचना सादर केली..
" शेती मातीचा तू मालक,
गुराढोरांचा तू चालक
रात्रंदिन राबणारा,
धरतीचा महानायक "
भुमय्या इंदूरवार यांनी सुंदर रचना सादर करून दाद मिळविली..
" काळ्या भुईच्या रानात,
माती गर्भार राहिली
रातीतून कण्हताना
पावसाने रे पाहिली "
वैशाली कयापाक या कवयित्रीने बळीराजाच्या कुंटूबाचे वर्णन असलेली सुंदर रचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली..
" लेक मने बापाला काळजी नको करू
भूक मारून जगू पण तू नको मरू.. "
रत्नकुमार नरुले या कविने शेतकऱ्यांचे आणि धरतीचे नाते अधोरेखीत करणारी कविता सादर केली..
" नांगरट कुळवट मेहनतीच्या यातना भोगते ती युगेनयुगे
पाझर ते हळवे वात्सल्य निखळ प्रेम धरतीच्या कुशीमध्ये.. "
कवी रवींद्र जाधव यांनी निसर्ग आणि वसुंधरेचे नाते स्पष्ट करणारी रचना सादर केली..
" कोपलास का निसर्ग राजा वेधूने घेशी मन
वसुंधरा ही तृप्त जाहली भिजऊनी आपले मन.. "
महानंदा चिभडे -बुरकुले या कवयित्रीने पावसाचं आणि गावाचं नातं सांगणारी रचना सादर केली..
" पावसा रे पावसा रे घे आता धाव
पाहतोय वाट तुझा सारा गाव.. "
कवी रामस्वरूप मडावी यांनी शेतकरी आणि पाऊस एकमेकास किती पूरक आहेत कवितेतून हे लक्षात आणून दिले..
" मिरगाच्या पावसानं जमीन निघाली नाहून
शेतात बियाणे पेरण्या बैल खट्या औत घेऊन.. "
विजया तारु या कवयित्रीने मातीशी नातं जुडणारी कविता सादर केली..
" मातीची परंपरा न कधी मिटेल न सुटेल
तिची नाळ सदैव आमच्याशी जुडेल.. "
राज्यस्तरीय आभासी कविसंमेलनात महाराष्टातील अनेक शिक्षक कवींनी सहभागी होवून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमचे बहारदार सुत्रसंचालन साहेबराव डोंगरे यांनी केले तर आभार गावधंगकार मिलिंद जाधव यांनी मानले. कार्यक्रमास शालिनी मेखा, श्रीकांत पाटील, तानाजी आसबे, बाबाराव डोईजड, प्रकाश पारखे, नरेंद्र कनाके, मोहिनी बागुल, सचिन कुसनाळे, बिभिषण पाटील, शेषराव पाटील यांच्यासह अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाचे राज्य व मराठवाडा विभागीय पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment