पुण्याच्या मराठवाडा समन्वय समितीचा डॉ.अशोक बेलखोडे यांना 'मराठवाडा भूषण' पुरस्कार जाहीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 17 September 2024

पुण्याच्या मराठवाडा समन्वय समितीचा डॉ.अशोक बेलखोडे यांना 'मराठवाडा भूषण' पुरस्कार जाहीर

किनवट   : मराठवाडा समन्वय समिती, पुणे च्या वतीने देण्यात येणारा सामाजिक क्षेत्रातील 'मराठवाडा भूषण' पुरस्कार किनवट येथील जेष्ठ समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे यांना नुकताच जाहीर झाला आहे.हा पुरस्कार  येत्या दि.१९ ला पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

  मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने २००९ सालापासून दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे, येथे मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात मराठवाड्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तींना पुण्यातील तमाम मराठवाडा वासीय व पुणेकरांच्या वतीने 'मराठवाडा भूषण' पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

  डॉ.बेलखोडे हे सामाजिक क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व आहेत. ते मागील तीस वर्षाहून अधिक काळ नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसरातील आदिवासी समाजासाठी खूप मोठे सेवा कार्य करत आहेत. समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयी डॉ.बेलखोडे हे करत असलेले सेवा कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या  बहुमूल्य योगदानासाठी 'मराठवाडा समन्वय समिती' पुणे, यांच्या वतीने २०२४ सालातील सामाजिक क्षेत्रातील 'मराठवाडा भूषण' पुरस्कार डॉ.बेलखोडे यांना प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. गुरुवारी(ता.१९) सायंकाळी सहा वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

 मागील वर्षापर्यंत दरवर्षी १७ सप्टेंबर रोजीच हा महोत्सव साजरा करण्यात येत होता. मात्र, यावर्षी १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी म्हणजेच गणपती विसर्जन आहे, त्यामुळे यावर्षीचा कार्यक्रम १९ सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे,अशी माहिती मराठवाडा समन्वय समिती, पुणे चे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील व उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर यांनी कळविली आहे.


No comments:

Post a Comment

Pages