आंबेडकरवादी मिशनमध्ये अधिकारी घडविण्याचा संस्कार : अरविंद रायबोले व प्रेमानंद सोनटक्केंचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
नांदेड,दि.२३ : आंबेडकरवादी विचारधारेतून प्रशासकीय अधिकारी घडविण्याचे कार्य करणाऱ्या आंबेडकरवादी मिशन, नांदेड येथे नुकतीच विशेष भेट संपन्न झाली. या वेळी महाराष्ट्र पोलीस दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) अरविंद रायबोले तसेच मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रेमानंद सोनटक्के यांनी मिशनला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना स्पर्धा परीक्षांबाबत सखोल मार्गदर्शन केले.
या प्रसंगी अधिकाऱ्यांनी आपल्या यशस्वी प्रवासातील अनुभव सांगत, कठोर परिश्रम, सातत्य, योग्य नियोजन आणि संविधानिक मूल्यांची जाणीव या यशाच्या महत्त्वाच्या गुरुकिल्ल्या असल्याचे विद्यार्थ्यांना पटवून दिले. आंबेडकरवादी मिशनसारख्या संस्थांनी दिलेले वैचारिक बळ व शिस्तबद्ध अभ्यासाची सवय यामुळेच आपण आज या पदावर पोहोचलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना अभ्यासक्रम, वेळेचे नियोजन, मुलाखत तयारी तसेच मानसिक तणाव व्यवस्थापनाबाबत प्रश्न विचारले. त्यावर अधिकाऱ्यांनी अत्यंत मोकळेपणाने व प्रेरणादायी उत्तर देत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला.
कार्यक्रमाच्या शेवटी दीपक कदम यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत या दोनही अधिकाऱ्यांनी, “समाजातील वंचित घटकांमधून प्रशासकीय नेतृत्व घडविण्याचे कार्य आंबेडकरवादी मिशन चे दीपक कदम हे सातत्याने करत आहे, ही बाब अभिमानास्पद आहे,” असे गौरवोद्गार काढले.


No comments:
Post a Comment