बोर्ड परीक्षा : कॉपीमुक्त वातावरणासाठी पालकांचा मेळावा
किनवट : येत्या फेब्रुवारी–मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त, तणावमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा(ता.किनवट)येथे पालक मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
या मेळाव्यात विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य प्रमोद मुनेश्वर, उपप्राचार्य राधेश्याम जाधव, उपमुख्याध्यापक किशोर डांगे, पर्यवेक्षक रघुनाथ इंगळे, संतोष बैस ठाकूर, मुकुंद मुनेश्वर, मनोज भोयर यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात केंद्र संचालक प्रा. डॉ. हेमंत सोनकांबळे यांनी शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षेसंबंधीच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती पालकांना दिली. यावेळी उपप्राचार्य राधेश्याम जाधव यांनी कॉपीच्या दुष्परिणामांवर भाष्य करत, अशा गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व भविष्यातील वाटचालीवर होणाऱ्या परिणामांची जाणीव करून दिली.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य प्रमोद मुनेश्वर यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे व कॉपीसारख्या प्रकरणांपासून दूर राहावे, असे आवाहन केले. पालकांनीही आपल्या पाल्यांना बोर्ड परीक्षेसाठी मानसिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे आभार प्रा. सुबोध मिलिंद सर्पे यांनी मानले. या पालक मेळाव्यास परिसरातील बहुसंख्य पालकांसह शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment