नागसेन फेस्टिव्हलची दशकपूर्ती!
सांस्कृतिक-वैचारिक चळवळीचा प्रेरणादायी दहा वर्षांचा प्रवास
छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी :
नागसेन फेस्टिव्हलच्या दशकपूर्ती निमित्त यंदा दि. २९, ३० व ३१ मार्च रोजी लुम्बिनी उद्यान, नागसेनवन येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दहा वर्षांत हा फेस्टिव्हल प्रभावी सांस्कृतिक आणि वैचारिक मंच म्हणून विकसित झाला असून, यंदाचे दशकपूर्ती वर्ष विशेष उत्साहात साजरे होणार आहे.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी १२५ व्या जयंतीनिमित्त सन २०१६ मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या काही मोजक्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी नागसेनवनात एकत्र येऊन या फेस्टिव्हलची सुरुवात केली. छोट्या स्वरूपात सुरू झालेला हा उपक्रम आज सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि बौद्धिक चळवळीचे व्यापक रूप धारण करून उभा आहे.
गेल्या दशकभरात या फेस्टिव्हलअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम, विचारपर परिसंवाद, कला उपक्रम, कवी संमेलन आणि सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून विद्यार्थी, तरुण आणि समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे कार्य करण्यात आले आहे. समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित आंबेडकरी विचारधारेची ठाम मांडणी करत हा महोत्सव सातत्याने पुढे सरकत राहिला आहे.
देश-विदेशातील नामवंत लेखक, पत्रकार, विचारवंत, अभिनेते, कवी आणि कलावंत यांच्या सहभागामुळे अल्पावधीतच या फेस्टिव्हलने विशेष लोकप्रियता मिळवली आहे आणि नागसेनवनाच्या वैचारिक परंपरेतील तो एक महत्त्वाचा घटक ठरला आहे.
कोरोना महामारीच्या कठीण काळातही या उपक्रमाची परंपरा खंडित झाली नाही. २०१९–२० दरम्यान ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, तसेच मास्क व पुस्तकांचे वाटप करून सामाजिक जाणीव जागविण्याचे कार्य सातत्याने सुरू ठेवण्यात आले.
दशकपूर्तीच्या प्रवासात देशातील विविध महत्त्वाच्या आणि तात्कालिक विषयांवर तज्ञ, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी परखड मते मांडत अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील शहीद रोहित वेमुला यांचे सहकारी प्रशांत दोंथा, न्यायमूर्ती के चंद्रु, (जयभीम चित्रपटाचे चरित्रनायक), निखिल वागळे, किशोर कदम, मिलिंद शिंदे, निरंजन टकले, प्रा.रतन लाल, विद्यार्थी नेते राहुल सोनपिंपळे आदी मान्यवरांनी या फेस्टिव्हलमध्ये सहभाग नोंदवला आहे.
या फेस्टिव्हलमध्ये अनेक गंभीर आणि वादग्रस्त विषयांवर चर्चा घडवून आणत आंबेडकरी चळवळीत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
या फेस्टिव्हलच्या माध्यमातून शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे, भीमशाहीर प्रतापसिंह बोदडे, माजी कुलगुरू विठ्ठल घुगे, ज्येष्ठ साहित्यिक तथा दलित पँथरचे संस्थापक सदस्य ज. वि. पवार, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, सुनिल तलवारे तसेच पूज्य भन्ते विशुद्धानंद बोधी यांना ‘नागसेन गौरव पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘मिलिंद सन्मान’ देऊन गौरविण्यात आले आहे.
🎭 कलावंतांचा हक्काचा मंच!
नागसेन फेस्टिव्हल हा केवळ वैचारिक व्यासपीठ न राहता कलावंतांचा हक्काचा मंच म्हणूनही ओळख निर्माण करत आहे. चित्रकला, संगीत, नृत्य, नाटक आणि विविध सर्जनशील कलांच्या माध्यमातून नवोदित व प्रस्थापित कलाकारांना अभिव्यक्तीची संधी येथे मिळते. या मंचामुळे अनेक तरुण कलावंतांना दिशा आणि ओळख मिळाली असून, सामाजिक जाणीव असलेल्या कलेला प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने घडत आहे.
दशकपूर्ती निमित्त हा फेस्टिव्हल अधिक व्यापक करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला असून, यंदाच्या महोत्सवात विविध आकर्षक कार्यक्रम, स्पर्धा, कला उपक्रम आणि वैचारिक सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या संदर्भात संयोजन समितीचे मुख्य निमंत्रक सचिन निकम व हेमंत मोरे म्हणाले,
“नागसेन फेस्टिव्हल हा केवळ एक कार्यक्रम नसून ती एक विचारांची चळवळ आहे. पुढील काळातही हा मंच अधिक व्यापक करून समाजपरिवर्तनासाठी योगदान देण्याचा आमचा संकल्प आहे.”
गेल्या दशकात सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि वैचारिक संवादाचा प्रभावी संगम घडवणारा हा महोत्सव आगामी काळात अधिक व्यापक स्वरूपात पुढे जाणार आहे. कार्यक्रमाचे सविस्तर वेळापत्रक पुढील दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

No comments:
Post a Comment