रेशन दुकानांतील EPOS, आयरिस स्कॅनरच्या तांत्रिक अडचणी दूर करा: रेशन व केरोसिन दुकानदार महामंडळाची मागणी
किनवट : जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या EPOS मशीन व आयरिस (AIS) स्कॅनर प्रणालीतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य रेशन व केरोसिन दुकानदार महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना नुकतेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यां मार्फत निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शासनामार्फत धान्य वितरणासाठी उपलब्ध करून दिलेल्या EPOS मशीनमध्ये नव्याने बसविण्यात आलेल्या स्कॅनर प्रणालीमुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. वृद्ध लाभार्थ्यांच्या अंगठ्याच्या ठशांची पडताळणी करताना वारंवार अडथळे येत असून अनेकदा सर्व्हर डाऊन होणे, नेटवर्क खंडित होणे किंवा मशीन हँग होणे अशा त्रुटींमुळे धान्य वितरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत.
या तांत्रिक समस्यांमुळे लाभार्थ्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून परवानाधारक दुकानदारांवरही अतिरिक्त ताण येत आहे. ओटीपी प्रणालीद्वारे पडताळणी करताना अनेक लाभार्थ्यांकडे मोबाईल सुविधा उपलब्ध नसणे, मोबाईल क्रमांक आधारशी संलग्न नसणे किंवा दुर्गम भागात नेटवर्क नसल्यामुळे व्यवहार पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.
तसेच शासनाकडून उपलब्ध करून दिलेल्या आयरिस (Eye) स्कॅनर प्रणालीतही तांत्रिक अडचणी येत असून पडताळणीसाठी अधिक वेळ लागत असल्याने वितरण प्रक्रिया मंदावते. त्यामुळे ग्राहक व दुकानदारांमध्ये वाद होण्याची शक्यता वाढत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
या सर्व बाबींचा विचार करून संबंधित विभागाने EPOS मशीन व स्कॅनर प्रणालीतील त्रुटी तातडीने दूर कराव्यात तसेच वितरण प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
हे निवेदन नांदेड जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कापसीकर, महासचिव राजाभाऊ कुलकर्णी व जिल्हाध्यक्ष देवानंद सरोदे यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment