नागसेन फेस्टिव्हलचा जल्लोषात समारोप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 4 April 2026

नागसेन फेस्टिव्हलचा जल्लोषात समारोप

 नागसेन फेस्टिव्हलचा जल्लोषात समारोप

3 दिवस हजारो नागरिकांच्या उपस्थितीत

कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैचारिक उपक्रमांची रेलचेल

व्यंगचित्र प्रदर्शनाचे आकर्षण



संभाजीनगर : 

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या वतीने भीमजयंती निमित्ताने मिलिंद महाविद्यालय, नागसेनवन परिसरात दि. २९, ३० आणि ३१ मार्च अशा ३ दिवसीय 'नागसेन फेस्टिव्हल'चा मंगळवार दि. ३१ रोजी जल्लोषात समारोप करण्यात आला. तीनही दिवस हजारो नागरिकांची या महोत्सवास उपस्थिती होती.


दि. २९ रोजी कन्नड चित्रपट अभिनेते चेतन कुमार अहिंसा यांच्या हस्ते या महोत्सवाचे भव्य उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आपल्या भाषणात बोलताना युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष समजून घ्यावा, त्याशिवाय परिस्थितीशी कसे लढायचे हे आपणांस समजू शकणार नाही, असे प्रतिपादन केले. शिवाय तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला भटकवले जात आहे. आपले मूळ विषय बाजूला जाऊन आपल्याला प्रतिक्रियावादी ठरविण्यात मनुवादी असुरी आनंद घेत आहेत, मात्र आता मार्ग शोधण्यासाठी बाबासाहेबांचा संघर्ष आणि विचार आपल्याकडे आहेत. त्यामुळे आपल्या कर्तव्याचा विसर पडू न देता सातत्यपूर्ण संघर्ष सुरू ठेवावा, असे प्रतिपादन केले.



यावेळी ज्येष्ठ पत्रकार उर्मिलेश यांनी 'बहुजनांच्या शैक्षणिक नाकेबंदीचे राष्ट्रीय षडयंत्र' या विषयावर सखोल विवेचन करताना नवीन शैक्षणिक धोरणाची चिरफाड केली. हे शैक्षणिक धोरण नसून मनुवाद रुजविण्यासाठी केलेली रीतसर खेळी आहे, असा घणाघात केला. कौशल्य विकासाच्या नावाखाली जातिआधारित व्यावसायिक शिक्षण आणून भेदभावाचे षडयंत्र रचले जात आहे, असे प्रतिपादन करत शिक्षणाला मौलिक अधिकार म्हणून स्थान असावे, हा बाबासाहेबांचा आग्रह होता. मात्र त्यासाठी अनेक वर्षांनंतर न्यायालयातून निकाल यावा लागला, हे या देशाचे दुर्दैव आहे, असे टीकास्त्र सोडले. बहुजनांचे शिक्षण धोक्यात आणण्यासाठी, उच्च शिक्षणापासून परावृत्त करण्याचा डाव रचला जात आहे, परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची माणसे हा डाव यशस्वी होऊ देत नाहीत. त्यामुळेच अनेक नेते हायजॅक करून हा लढा कुठेतरी अडवून ठेवायचा डाव आपण हाणून पाडावा, असे आवाहन केले.


मंचावर व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव, प्राचार्य सुनील वाकेकर, प्राचार्य धन्यकुमार टिळक, युवा कवी बच्चा लाल उन्मेष यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी चेतन कुमार अहिंसा यांच्या हस्ते व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. कार्टूनिस्ट कंबाईन आणि मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने सुमारे ४८ चित्रकारांची १५० हून अधिक चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.


लोकशाही, गॅस टंचाई, माध्यमांची मुस्कटदाबी, सोशल मीडियाचे व्यसन, शिक्षण क्षेत्राची भांडवली व्यवस्था, मराठी शाळांची दुरवस्था असे अनेक चित्रांनी उपस्थितांना विचार करण्यास भाग पाडले.


नितीन गायकवाड आणि संचाने शास्त्रीय गायनातून 'भीमस्मरण' सादर केले, मिलिंद हायस्कूलच्या विद्यार्थिनी आणि प्रांजल सुरडकर यांनी अभिवादनपर नृत्य सादर केले.

रायफल शूटिंग प्रशिक्षक सुंदर घाटे, केंब्रिज विद्यापीठाचे संशोधक विद्यार्थी अभिजित वाघरे, डॉ. आनंद भुक्तर यांना मिलिंद सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सूत्रसंचालन सचिन निकम, प्रास्ताविक सिद्धार्थ मोकळे तर आभार हेमंत मोरे यांनी केले.

■ महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 

*एल्गार समतेचा हे कविसंमेलन* पार पडले. यात बच्चा लाल उन्मेष हे अध्यक्षस्थानी होते, तर डॉ. अभिजित खांडकर, उमेश खोब्रागडे आणि दोन्ही पायांनी दिव्यांग असलेले गझलकार गणेश खरात यांचा सहभाग होता.

एकवेळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सुभेदार रामजी आंबेडकर सभागृहात पुढील कार्यक्रम यशस्वीपणे पार पडले.

बच्चा लाल उन्मेष यांची बहुचर्चित 'कौन जात हो भाई' या कवितेसोबतच 'हमे जमीन चाहिए, सारा आसमान तुम रख लो; हमे संविधान चाहिए, गीता कुरान तुम रख लो' ही खास शैलीत सादर केलेली कविता विशेष दाद मिळवून गेली, तर गणेश खरात यांची 'माणसांना माणसाचा त्रास आहे गौतमा, चेहऱ्यावर कारुण्याचा भास आहे गौतमा' ही गझल सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

तर खोटाच वाचला हो इतिहास काल ज्यांनी, त्यांचाच पोरगाही शाळेत पास झाला, अशी मांडणी करून शैक्षणिक क्षेत्रातील जात वास्तवावर प्रहार केला. तर पुढे झेंडेच उंच केले सज्ञान माणसांनी, मूर्तीत बुद्ध माझा तेव्हा उदास झाला या ओळींनी आत्मचिंतनास भाग पाडले.

डॉ. अभिजित खांडकर यांची मारोती कांबळेचे काय झाले ही हिंदी अनुवादित कविता सादर केली.

गिरीश खोब्रागडे यांची आपला पाडाव करण्याचे जमेना म्हणून ते इथे रचतात म्हणून कट नव्याने, जाहलो नाहीच जर आताच सावध, ओढवू शकते पुढे संकट नव्याने ही रचना सादर करून संघर्षाची गरज अधोरेखित केली.

दुसऱ्या सत्रात

'नव माध्यमातील आंबेडकरी पत्रकारितेचे वर्तमान आणि भविष्य'* या विषयावर सुमित चव्हाण, दिल्ली, साहिल वाल्मिकी, नोएडा, हितेश कुमार, हाथरस (उत्तर प्रदेश), मनीष सागर, मनाली, तर ठाणे येथील राज आसरोडकर यांनी डिजिटल माध्यम आणि आंबेडकरी पत्रकारितेच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. यातील दिल्ली येथील सुमित चव्हाण यांनी माध्यमातील भांडवलशाही देशाचे मोठे नुकसान करत आहे, सत्य लपविण्यासाठी फेक नॅरेटिव्ह सेट केले जातात. ही मेनस्ट्रीम मीडिया नसून मनुस्ट्रीम मीडिया आहे, असा घणाघात केला. तसेच आता डिजिटल माध्यमातून कमी संसाधने वापरून प्रामाणिक पत्रकारितेला जागा निर्माण झाली आहे. डिजिटल माध्यमे ही ८० टक्के वर्गाचे प्रतिनिधित्व करणारी हक्काची मीडिया आहे, लोकांनी साथ देणे गरजेचे आहे, असे आवाहन केले.

साहिल वाल्मिकी यांनी बाबासाहेबांच्या पत्रकारितेचे संदर्भ देत त्यावेळेसारखी परिस्थिती आज नसतानाही लोक सत्य बोलायला घाबरतात. माध्यमांची मालकी असलेले लोक आपले इतर व्यवसाय भागीदारी टिकवण्यासाठी माध्यमांचा वापर करतात, हे धोकादायक आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला धोका झाल्यास भांडवलशाही वर्गाची गुलामगिरी आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे डिजिटल माध्यमांचा अधिकाधिक वापर करून आपले प्रश्न तडीस न्या, असे प्रतिपादन केले.

राज आसरोडकर, हितेश कुमार यांनी डिजिटल माध्यमाचे महत्त्व सांगितले. सर्वसामान्यांना न्याय देण्याची शक्ती पत्रकाराच्या हातात आहे, तिचा योग्य वापर करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले.

यानंतर पाराई वादन करून आडवी आर्टने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. तामिळ भाषेत गुलामगिरी संपवून टाकायची आहे, समता आणण्यासाठी लढावे लागेल, असे मांडले.

साहित्यिक डॉ. सतीश म्हस्के, डॉ. महेंद्र गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सचिन डोंगरे यांना मिलिंद सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.

सूत्रसंचालन सिद्धार्थ मोकळे, प्रास्ताविक सचिन निकम तर आभार रत्नदीप रगडे यांनी केले.

■ सांगता

महोत्सवाच्या समारोपाला रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, सफाई कर्मचारी आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक बेझवाडा व्हील्सन यांनी स्वातंत्र्यानंतर देशात आजही अनेक जिल्ह्यांत महिलांना हाताने मैला साफ करावा लागतो, ही देशासाठी लाजिरवाणी बाब आहे, असे सांगितले. स्वच्छ भारतासारखे अनेक उपक्रम आले तरीही हाताने मैला साफ करण्याची प्रथा बंद झालेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

ते *तंत्रज्ञानाचा बुरखा, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगचा चेहरा : भारताचं जात वास्तव* या विषयावर भाष्य करत होते.

स्वातंत्र्यानंतर देशात आजही अनेक जिल्ह्यांत महिलांना हाताने मैला साफ करावा लागतो, ही देशासाठी लाजिरवाणी बाब आहे. स्वच्छ भारतासारखे अनेक उपक्रम आले तरीही हाताने मैला साफ करण्याची प्रथा बंद झालेली नाही, अशी खंत मॅगसेसे पुरस्कार प्राप्त सफाई कर्मचारी आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक बेजवाडा विल्सन यांनी व्यक्त केली.


उल्लेखनीय काम करणाऱ्या बुद्ध विहार समित्यांपैकी

साकेत बुद्ध विहार, साकेत नगर, तक्षशिला बुद्ध विहार, संजय नगर, धम्मसेवा संघ बुद्ध विहार, जयभवानी नगर, त्रिरत्न बुद्ध विहार, माऊली नगर, बोधिसत्व बुद्ध विहार, संघरत्न बुद्ध विहार, मयूर पार्क, पद्मपाणी बुद्ध विहार, बजाज नगर, कपिलवस्तू बुद्ध विहार, उस्मानपुरा, शाक्यपुत्र बुद्ध विहार, भोईवाडा यांच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.


‘जल्लोष भीमजयंतीचा’ या विशेष सत्रात प्रांजल सूरडकर, रिदम रिव्होल्युशन संघाच्या पथकाने, विपीन तातड आणि टीम यांनी रंगतदार सादरीकरण केले. मेघानंद जाधव, अरहं वाळके यांनी भीमगीते सादर केली.

पंजाबराव मोरे यांनी संविधान पोवाडा गाऊन जल्लोष भरला तर 

विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या चित्रकार नंदकुमार जोगदंड, बिन छताची शाळा चे भगवान सदावर्ते, लेणी अभ्यासक सूरज जगताप, ऍड. महेश भोसले, दामा फाउंडेशन यांचा सन्मान करण्यात आला.

नृत्य दिग्दर्शक उत्कर्षा बोरीकर, राज्यपाल गवई, राहुल अंकुशे, उमेश चाबुकस्वार यांचा नृत्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याच्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.



दशकपूर्ती महोत्सव

दशकपूर्ती नागसेन महोत्सवाच्या या सांगता समारंभात चित्रपट अभिनेते प्रविण डाळिंबकर, भीमराव सरवदे, अॅड. अमोल सावंत, चित्रकार संजीव सोनपिंपरे, प्राचार्य टी. ए. कदम, माजी प्राचार्य यु एल जगताप, के एम बनकर यांनी मार्गदर्शन केले.


महोत्सवात तीनही दिवस युजीसी इक्विटी बिलाला दिलेली स्थगिती, महाबोधी विहाराचा तिढा आणि अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण यावर सुमारे ४२०० नागरिकांनी आक्षेप नोंदवत स्वाक्षरी मोहिमेत सहभाग नोंदविला.


महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सचिन निकम, हेमंत मोरे, सिद्धार्थ मोकळे, ऍड. सुनील मगरे, प्रा. मिलिंद मनवर, प्रा. के एम बनकर, ऍड. अनिल वरठे, मेघानंद जाधव, प्रा. प्रबोधन बनसोडे, कुणाल भालेराव, प्रसेनजीत गायकवाड, राष्ट्रपाल गवई, सुमित सुरडकर, सागर गायकवाड, चिरंजीव मनवर, सागर ठाकूर, ब्रिजेश इंगळे, अतुल चव्हाण, किरण मगरे, रत्नदीप रगडे, सुमेध नरवडे, मंथन गजहंस, जय कांबळे, सम्यक त्रिभुवन आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Pages